नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन कॅन्सर २०२६ मध्ये कर्करोगाबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. सध्या जगभरात दरवर्षी सुमारे २.०६ कोटी नवीन कर्करोग रुग्ण आढळत आहेत. मात्र, प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास २०५० पर्यंत ही संख्या सुमारे ३.५ कोटींवर पोहोचू शकते. म्हणजेच पुढील दोन दशकांत कर्करोगाचे प्रमाण जवळपास ६७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अहवालानुसार, प्रत्येक पाचपैकी एक व्यक्तीला आयुष्यात कधीतरी कर्करोग होण्याचा धोका आहे. याशिवाय, स्वत:ला किंवा कुटुंबातील जवळच्या सदस्याला कर्करोग झाल्यामुळे जगातील तब्बल ९२ टक्के लोक या आजाराच्या परिणामांना सामोरे जाऊ शकतात. त्यामुळे हा आजार केवळ रुग्णापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबावर मानसिक, सामाजिक आणि आर्थिक ताण निर्माण करतो. आरोग्य व्यवस्थेवरही याचा मोठा भार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, वाढते वय, लोकसंख्येतील वाढ, तंबाखूचे सेवन, मद्यपान, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, असंतुलित आहार, वायुप्रदूषण तसेच ऌढश्, हिपॅटायटिस बी आणि सीसारखे संसर्ग हे कर्करोग वाढण्यामागील प्रमुख घटक आहेत. आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, सुमारे ४० टक्के कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांद्वारे टाळता येऊ शकतात. त्यामुळे तंबाखूविरोधी धोरणे, लसीकरण, नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैलीला अधिक महत्त्व देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
अहवालात आरोग्य सेवांमधील विषमता स्पष्टपणे दिसून आली आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्तनाच्या कर्करोगासारख्या अनेक प्रकारांमध्ये पाच वर्षांचे जगण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण सुमारे ४० टक्के किंवा त्याहून कमी आहे. अनेक देशांमध्ये अत्यावश्यक औषधे, रेडिओथेरपी सुविधा आणि वेळेवर निदान उपलब्ध नसल्याने लाखो रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यू गरीब देशांमध्ये तुलनेने अधिक आहेत.
आर्थिक आणि मानसिक परिणामही तितकेच गंभीर
कर्करोग हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून तो आर्थिक आणि मानसिक संकटही निर्माण करतो. अनेक रुग्णांनी उपचारांचा खर्च परवडत नसल्याचे सांगितले आहे. काही कुटुंबांना उपचारांसाठी शिक्षण, बचत किंवा इतर गरजा बाजूला ठेवाव्या लागतात. अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना नैराश्य, ताण, सामाजिक एकाकीपणा आणि दीर्घकालीन मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तज्ज्ञांनी केले आवाहन
जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना कर्करोग प्रतिबंधासाठी ठोस धोरणे राबविण्याचे आवाहन केले आहे. तंबाखू आणि मद्यपानावर नियंत्रण, लसीकरणाचा विस्तार, नियमित कर्करोग तपासणी, जनजागृती आणि दर्जेदार उपचार सर्वांसाठी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
















