मुंबई : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांनी या विभागाचा कारभार हाती घेताच अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणा-यांना घाम फोडला आहे. दूध भेसळीविरोधात मुंडे यांनी मोठी मोहीम उघडली होती. त्यानंतर तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता शाळा आहेत. अलीकडेच मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षणाधिका-यांसोबत एफडीएची बैठक पार पडली.
मध्यान्ह भोजन व शाळांमधील उपाहारगृहांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन सरसावले आहे. आता मुंबईतील खासगी शाळांमधील उपाहारगृहे तसेच मध्यान्ह भोजन पुरविणारे किचन शेड यांच्यावर एफडीएची करडी नजर असणार आहे. यासंदर्भात मुंबईत विविध ठिकाणी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि बचत गट चालकांसोबत शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली.
अन्न सुरक्षा मानके अधिनियम २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही गतिमान कार्यवाही सुरू केली आहे. शालेय स्तरावर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याचे पालन संबंधितांनी केले नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतही मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्टिंग’वर बंदी
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्टिंग आणि इतर एनर्जी ड्रिंक्सच्या बाटल्यांवर ‘एनर्जी ड्रिंक’ असा शब्द न लिहिण्याबाबत कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. तसेच, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत, राज्यातील शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’च्या विक्रीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय विधानसभेत जाहीर करण्यात आला आहे.
















