लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेस देण्यात आलेली ८ ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदत अपुरी असून, राज्यातील प्रत्यक्ष परिस्थिती, तांत्रिक अडचणी आणि नागरिकांची व्यस्तता लक्षात घेता या प्रक्रियेस किमान दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम, जिल्हा लातूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने दि. २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी, लातूर यांच्यामार्फत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पुनरावलोकन प्रक्रियेच्या निर्णयाचे स्वागत असले, तरी सुमारे १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रासारख्या विशाल राज्यासाठी सध्या दिलेली मुदत अत्यंत अपुरी आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून लाखो शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्याचबरोबर आषाढीवारी, विविध धार्मिक कार्यक्रम आणि इतर सामाजिक कारणांमुळे मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावांपासून दूर आहेत. अशा परिस्थितीत घाईघाईने प्रक्रिया पूर्ण केल्यास अनेक पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
संघटनेने असेही निदर्शनास आणून दिले की, अनेक भागांमध्ये अद्याप ढ१ी-रकफ टंस्रस्र्रल्लॅ पूर्ण झालेले नाही. ऑनलाइन प्रणाली, डिजिटायझेशन आणि डेटा अपलोडिंगमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. तसेच बीएलओ, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा ताण असून त्यांना पुरेसा वेळ व सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे घराघरात जाऊन अर्ज वितरण व संकलनाच्या प्रक्रियेत त्रुटी राहण्याची शक्यता वाढली आहे.
लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि एकही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम, जिल्हा लातूर यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक तसेच जमीयतुल उलेमा ए हिंद संघटनेचे जिल्हा सचिव मुफ्ती ओवेस कास्मी, जमात ए इस्लामी हिन्दचे शहराध्यक्ष रफीक शेख, तसेच मुफ्ती इर्शाद, मौलाना जुबेर, मौलाना अब्दुल अजीम, ज्येष्ठ नागरिक मशायक, मुकर्रम अली व इतर समाज सेवक उपस्थित होते.
















