मुंबई : प्रतिनिधी
देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची धग देशभर पसरली असून विरोधातील राजकीय पक्षांनी थेट आंदोलनात सहभाग घेतल्याचे दिसून आले. पोलिसांकडून झालेल्या मारहाणीनंतर देशभरात जनता मोदी सरकारवर संतप्त झाली असून वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली.
दिल्लीत जंतरमंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिले. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून आता महाराष्ट्राच्या गल्लीतही संताप पाहायला मिळत आहे.
















