कॉंग्रेस आक्रमक, मोदींच्या निवासस्थानासमोर ठिय्या, नेते ताब्यात, राजधानीत राडा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट पेपरफुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी नवी दिल्लीत सुरू झालेल्या आंदोलनाने आता व्यापक स्वरूप धारण केले. आंदोलकांवर लाठीहल्ल्यानंतर अभिजीत दिपके यांनी जंतरमंतरवर आंदोलन तीव्र केले. आता या आंदोलनाला राजकीय बळ मिळत आहे. आज राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांसह नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जवळपास ३ तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, सपा नेते अखिलेश यादव यांच्यासह कॉंग्रेस, सपा खासदार, नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावरून दिल्लीत चांगलाच राडा झाला असून, अडीच तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांची सुटका केली. मात्र, या घडामोंडीमुळे दिल्लीत आणि देशात आंदोलन चांगलेच पेटले आहे.
मंगळवारी दुपारी साडेतीनपासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सपा नेते अखिलेश यादव यांच्यासह जवळपास ३ तास ठिय्या आंदोलन केले. काही वेळांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधी यांच्या भेटीसाठी आले आणि यासंबंधी संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु राहुल गांधी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या करीत ठिय्या आंदोलनावर ठाम राहिले. दरम्यान, ३ तासांनंतर पोलिसांनी राहुल गांधींसह कॉंग्रेस, सपा नेत्यांना जबरदस्तीने उचलले आणि त्यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी प्रियंका गांधी यांना मंदिरमार्ग पोलिस ठाण्यात नेले तर राहुल गांधींना छत्रसाल स्टेडियममध्ये नेण्यात आले आणि अडीच तासांनंतर त्यांना रात्री उशिरा सोडले. यावरून दिल्लीत चांगलाच राडा झाला. कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आता दिल्लीत सरकारविरोधात चांगलेच आंदोलन पेटले. दरम्यान, सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलिस स्टेशनला पोहोचल्या आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचीही सुटका झाली. राहुल गांधी यांना छत्रसाल स्टेडियममध्ये ठेवण्यात आले. त्यांचीही सुटका केली.
दरम्यान, पोलिसांनी लाठीमार करणे, विद्यार्थ्यांना जखमी करणे हे कोणाला मान्य नाही. देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना जबरदस्ती उचलण्यात आले. केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. नीटच्या मुद्यावर संसदेत चर्चा झाली पाहिजे. संपूर्ण भारत देश नीटच्या मुद्यावर विद्यार्थ्यांसोबत आहे, असे काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले.
राजीनामा घेतल्याशिवाय
स्वस्त बसणार नाही
शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आम्हाला अटक केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही जबरदस्तीने उचलून नेले. पण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिला.
शरद पवार यांनी
घेतली दिपकेंची भेट
एकीकडे राहुल गांधी खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थाबाहेर धडकले. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी त्यांनी अभिजित दिपकेंसह आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीवर चिंता व्यक्त केली.
लाठीचार्जमुळे
वातावरण तापले
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लाठीचार्जवरून दिल्लीचे राजकारण वादाच्या भोव-यात सापडले आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या ठिय्या आंदोलनाच्या वेळी कॉंग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी धर्मेंद प्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
ठाकरे जंतरमंतरवर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी रात्रीच जंतरमंतरवर दाखल झाले आणि त्यांनी दिपके यांच्यासह आंदोलकांशी संवाद साधला. दिल्लीत मी भाषण करण्यासाठी नव्हे तर युवा शक्तीला नमन करण्यासाठी आलो आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पाहतोय एक सरकार जे आपल्या भविष्यावर लाठीचार्ज करत आहे. तुम्ही फक्त तरुण नाही तर या देशाचे भविष्य आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
















