मुंबई : प्रतिनिधी
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या लाखो कर्मचा-यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. एसटी कर्मचा-यांसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता आण घरभाडे भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे.
प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदन जारी करत ही घोषणा केली. एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करत महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचा-यांचा महागाई भत्ता थेट ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज विधानसभेत केली. याशिवाय, कर्मचा-यांच्या घरभाडे भत्त्यातही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
आंदोलनापूर्वीच सरकारने केली वेतनवाढ!
एसटी कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सरकारने कर्मचा-यांना मोठी वेतनवाढ जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाची घोषणा करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, कालच मी एसटी महामंडळाच्या सर्व युनियनची बैठक घेतली होती. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात सेवा देणा-या ८६ हजार कर्मचा-यांच्या न्यायहक्काला दाद देणे हे आमचे कर्तव्य आहे. महाविकास आघाडीच्या काळात एसटीचा संप भरकटला होता, मात्र आमच्या सरकारने कर्मचा-यांच्या भावना समजून घेतल्या आहेत.
राज्य सरकारी कर्मचा-यांच्या धर्तीवर आता एसटी कर्मचा-यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून वाढवून ५८ टक्के करण्यात आला आहे. तर, यापूर्वी मिळणारा ८, १६ आणि २४ टक्के घरभाडे भत्ता वाढवून आता अनुक्रमे १०, २० आणि ३० टक्के करण्यात आला आहे. कर्मचा-यांचा वार्षिक वेतन वाढीचा दर आता २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे.
















