नवी दिल्ली : नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून देशभरात वातावरण तापलेले असतानाच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आंदोलक आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. हा केवळ काही घटकांचा स्टंट नसून, देशात अराजकता माजवू पाहणा-या विध्वंसक शक्तींची ही ‘बी’ टीम आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
नीट पेपरफुटीच्या प्रकरणांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) या उपरोधिक/व्यंग्यात्मक संघटनेने आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा खरपूस समाचार धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला आहे. धर्मेंद्र प्रधान म्हणाले ही सरळ सरळ विध्वंसक घटकांची ‘बी’ टीम आहे. ज्यांना जनतेने लोकशाहीत नाकारले आहे, तेच आता वेगळ्या मुखवट्यांआड लपून यंत्रणेला टार्गेट करत आहेत. देशाचे तुकडे करण्याची भाषा करणा-यांच्या समर्थनार्थ हे लोक घोषणाबाजी करत आहेत. त्यांचे खरे चेहरे आता समोर आले असून त्यांची ओळख पटली आहे.
२२ लाख विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा
शिक्षणमंत्र्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा अवघ्या एका दिवसापूर्वीच देशभरातील २२ लाखाहुन अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची फेरपरीक्षा दिली आहे. महिन्याापूर्वी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे आणि गोंधळामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच, ‘सीजेपी’ने प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने काही शिक्षकांवर मोठा विश्वास दाखवला होता, मात्र त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. थोडक्यात सांगायचे तर, इथे ‘रक्षकच भक्षक’ बनले,’’ अशा शब्दांत धर्मेंद्र प्रधान यांनी आपली नाराजी आणि उद्वेग व्यक्त केला आहे.
















