जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच तालुक्यातील अनेक गावामध्ये दि २२ जूनच्या रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. रात्री ८ वाजता पाऊस सुरु झाला आणि रात्री २ वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला. एकाच रात्रीत झालेल्या पावसाने कमाल केली, अनेक साठवण तलाव तसेच पाझर तलाव भरले आहेत. जळकोट तालुक्यातील तिरु नदी या पावसामुळे ओसंडून भरून वाहत होती. यामुळे जळकोट तालुक्यातील पाणीटंचाई काही अंशी कमी झालेली आहे .
यावर्षी किती पाणीटंचाई भासणार या चिंतेत जळकोट तालुक्यातील नागरिक होते. तालुक्यातील सर्वच साठवण तलावांमधील पाणीसाठा संपत आला होता तर अनेक साठवण तलाव कोरडे पडले होते मात्र एकाच रात्रीच्या पावसाने कमाल केली, अनेक साठवण तलाव तसेच पाझर तलाव भरले आहेत. जळकोट तालुक्यातील तिरु नदी या पावसामुळे ओसंडून भरून वाहत होती. या पावसामुळे जळकोट परीसरातील अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला होता. पहिल्याच मान्सूनच्या पावसाने शेतीची दाणादाण उडवली . एका शेतक-यांच्या शेतीचे पाणी दुस-या शेतक-यांच्या शेतात घुसले, बांध फुटले. शेतक-यांची शेत जमीनीवरील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. यामुळे शेतक-यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले .
यासोबाच वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत . तसेच अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली आहेत तसेच रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. यामुळे जळकोट, कोळनूर, पाटोदा खु, परीसरातील पाझर तलाव १०० टक्के भरले आहेत तर दि २२ जूनपर्यंत कोरडा पडलेला जंगमवाडी साठवण तलाव एकाच पावसात ८० टक्के भरला आहे तर हळदवाढवणा साठवण तलावही ८० टक्के भरला आहे. यासोबतच माळहिपरगा तसेच रावणकोळा परिसरात असणा-या अनेक तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इतर तलावातही ५० टक्केंच्यावर पाणीसाठा जमा झाला आहे.
















