29.9 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकार्यकर्त्यांनो आचारसंहिता भंग होईल असे काहीही करू नका

कार्यकर्त्यांनो आचारसंहिता भंग होईल असे काहीही करू नका

अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

पुणे : कचाकचा बटण दाबा, मतदान करा, या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केल्यानंतर आता अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनादेखील सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

कार्यकर्त्यांनो आचारसंहिता भंग होईल, असे काहीही करू नका म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खड्या शब्दांत समज दिली आहे. अजित पवार आज बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आणि महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना विविध सूचना केल्या आणि मोदींनाच निवडून आणण्याचा निर्धार केला.

अजित पवार म्हणाले की, खडकवासला विधानसभेच्या कार्यकर्त्यांचं काम चांगलं आहे. त्यांना प्रतिनिधीदेखील चांगला आहे. मात्र गावात किंवा कोणत्याही चौकात होर्डिंग लावताना विचार करा. निवडणुकीचा खर्च जेवढा आहे तेवढ्याच खर्चात सगळ्या गोष्टी बसवा. त्यानंतर कोणत्याही पद्धतीने आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची नक्की काळजी घ्या आणि महत्त्वाचे म्हणजे गाफिल राहू नका, अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

ते पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदींना आपल्याला तिस-यांना पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय भारताला पर्याय नाही. त्यांच्याशिवाय भारताचा विकास करणारा कोणी नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच मोठी मेहनत घेऊन मोदींना पंतप्रधान करायचं आहे. मोदी हे २९ एप्रिलला पुण्यात सभा घेणार आहेत. पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहेत. त्यापूर्वी मोदींचा पुण्यात रोड शो होणार आहे. पुण्यातील सर परशुराम कॉलेजच्या मैदानात ही सभा होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

कार्यकर्त्यांनो एकत्र मिळून काम करा!
लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. कोणत्याही पद्धतीची नाराजी न ठेवता एकत्र काम केले तरच मोदींना पंतप्रधान करण्यात आपण यशस्वी होऊ. कार्यकर्त्यांनी आपलं सोशल मीडिया नीट सांभाळा. त्यासोबतच भाषादेखील नीट वापरा. प्रचार करताना पाणी प्या, दुसरं काही पिऊ नका, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR