कुवैत : वृत्तसंस्था
शस्त्रसंधीमुळे काही काळ शांत असलेल्या पश्चिम आशियातील युद्धाचा ज्वर पुन्हा वाढताना दिसत आहे. अमेरिकेकडून हल्ले करण्यात आल्यानंतर खवळलेल्या इराणने आता शेजारील देशांनाच लक्ष्य करणे सुरू केले असून, कुवैतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच मिसाईल आणि ड्रोन्स डागले आहेत. या हल्ल्यानंतर विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली.
कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणने मिसाईल हल्ला केला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या टर्मिनल-१ वर हा हल्ला करण्यात आला. मिसाईल आणि ड्रोन विमानतळावर डागण्यात आले. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर विमानतळाच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर विमानांची ये-जा तात्काळ थांबवण्यात आली.
येणारी विमाने दुसरीकडे वळवली
कुवैतच्या सार्वजनिक नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सांगितले की, हल्ला झाल्यानंतर विमानतळावर आणीबाणी घोषित करून मदत कार्य सुरू करण्यात आले. प्रवासी आणि विमानतळावर काम करणा-या कर्मचा-यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एसओपी लागू करण्यात आली.
















