रेणापूर : प्रतिनिधी
शेतात जाण्यासाठी नंबर बांधावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यात यावा, या मागणीसाठी एका शेतक-याने थेट तहसीलदारांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तहसील प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित नंबर बांधावरील अतिक्रमण हटवून शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले.
यशवंतवाडी (ता. रेणापूर) येथील गट क्रमांक २५२/३ व २५२/४ मधील शेतांपर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी नारायण सूर्यवंशी व इतर शेतकरी सन २०१४ पासून तहसील कार्यालयाकडे विविध निवेदनांद्वारे करीत होते. संबंधित नंबर बांधावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली असून काही भागात काटेरी झुडपे वाढल्याने शेतात जाणे कठीण झाले होते. त्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी यांसारखी शेतीची वाहने नेणे शक्य नसल्याने शेतीची कामे करणे मोठ्या अडचणी येत होत्या. वारंवार निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने नारायण सूर्यवंशी यांच्या पत्नी मीरा नारायण सूर्यवंशी यांनी २५ मे रोजी रेणापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणही सुरू केले होते. त्यानंतर तहसीलदार प्रशांत थोरात यांनी २६ मे रोजी लेखी पत्र देत २८ मे रोजी भूमी अभिलेख विभाग व मंडळ अधिका-यांमार्फत संबंधित गटाच्या हद्दी व खुणा कायम करण्यात येतील तसेच २९ मे रोजी अंतिम सुनावणी घेऊन नियमानुसार निर्णय करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
















