लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामाच्या तोंडावर शेती रस्ते, बांधावरील वाद, अतिक्रमण, मालकी हक्क, वहिवाट, जमिनीचे वाटप, विविध कौटुंबिक व सामाजिक वाद होतात. या प्रश्नांसाठी शेतक-यांना पोलीस ठाणे व इतर कार्यालयांच्या वारंवार फे-या माराव्या लागत होत्या. ही गैरसोय दूर करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने दि. १६ मार्च ते ३० मे या कालावधीत शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकत ६६३ शेती विषयक प्रकरणांचा सांमजस्याने निपटारा केला आहे.
ग्रामीण भागातील शेतक-यांच्या समस्या त्यांच्या बांधावर जाऊन समजून घेणे, शेतीविषयक तक्रारी व वादांचे तातडीने निवारण करणे तसेच पोलीस आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे या उद्देशाने, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत दि. १६ मार्च ते ३० मे या कालावधीत राबविण्यात आलेला पोलीस शेतक-याच्या बांधावर हा अभिनव उपक्रम ग्रामीण भागात अत्यंत प्रभावी ठरत आहे. या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे शेतीसंदर्भातील अनेक तंटे न्यायालयीन वादात किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतरित होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविण्यात यश आले. त्यामुळे शेतक-यांचा वेळ आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात वाचला असून ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा टिकविण्यास मदत झाली आहे. अनेक गावांमध्ये शेतक-यांनी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
















