शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील येरोळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी, लघु उद्योजक, व्यापारी व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना विजेची अधिक गरज भासत आहे मात्र, सततच्या लोडशेडिंगमुळे घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीसाठी मोटारी चालविणे तसेच लघुउद्योगांचे कामकाज प्रभावित होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. येरोळ परिसरातील अनेक शेतक-यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण होत आहे. परिणामी शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच वारंवार होणा-या कमी-जास्त दाबाच्या विजेमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याच्याही तक्रारी आहेत.
नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तांत्रिक बिघाड दूर करावा, दोषी वीजवाहिन्यांची दुरुस्ती करावी आणि नियमित व अखंडित वीजपुरवठा सुनिश्चीत करावा, अशी मागणी केली आहे.
वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महावितरणने तातडीने उपाययोजना करून सुरळीत वीजपुरवठा करावा,, अशी मागणी येरोळ परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान याबाबत महावितरण प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले असून, लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मिळाली आहे
















