जळकोट : प्रतिनिधी
यंदाच्या हंगामात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात असल्याने जळकोट तालुका कृषी विभागाने पाण्याच्या नियोजनबद्ध वापराबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कमी पावसाच्या परिस्थितीतही पीक उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे, अशी माहिती जळकोटचे तालुका कृषी अधिकारी संजय पाटील यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीने गावागावांत बैठका, शेतकरी मेळावे आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून पाण्याचा काटकसरीने वापर, सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब, शेततळ्याचा वापर, पावसाच्या पाण्याचे संधारण तसेच कमी पाण्यावर येणा-या पिकांची निवड याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
जळकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने अल निनोच्या पार्श्वभूमीवर शिवार फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये दर आठवड्यास दोन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शिवार फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. सदर फेरीमध्ये बीबीएफ तंत्रज्ञान, बेडवरील टोकन पद्धती, जलतारा, विहीर पुनर्भरण प्लास्टिक मल्चिंग शेततळे इत्यादी घटकांचा वापर करून पाणी पातळी वाढविण्याबाबत व पाण्याचा काटकसरने वापर करण्याबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
जळकोट तालुक्यात यावर्षी अलनिनोच्या पार्श्वभूमीवर तब्बल २ हजार हेक्टर क्षेत्रावर बीबीएफ तंत्रज्ञानाने सोयाबीनची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच बेडवर टोकन पद्धतीने लागवड करण्याचेही २ हजार हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट आहे. तालुक्यातील कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी शेतक-यांच्या भेटी घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे आवाहन करीत आहेत. ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर वाढविणे, शेतामध्ये आच्छादनाचा वापर करणे आणि पिकांच्या गरजेनुसारच सिंचन करणे यावर भर दिला जात आहे. अल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतक-यांना दीर्घकालीन नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे तसेच कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पीक पद्धतीमध्ये आवश्यक बदल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचा योग्य व कार्यक्षम वापर केल्यास कमी पावसाच्या परिस्थितीतही उत्पादनावर होणारा परिणाम कमी करता येईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जनजागृती अभियानास वेग देण्यात आला असून शेतक-यांचा प्रतिसादही वाढत असल्याचे दिसून येत आहे. जळकोट तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक आपल्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी शेतक-यांना यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
















