चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील विविध गावांमध्ये घरकुल योजनेच्या कामात घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तसेच ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या त्रिसदस्य समीतीत विस्तार अधिकारी एम.व्ही.माने, ग्रामपंचायत अधिकारी एस.आर.शेख आणि वरिष्ठ सहाय्यक एस.डी.भुरे यांचा समावेश आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावातील सन २०२३-२४, सन २०२४-२५ आणि २०२५ ते २०२६ या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना तसेच शबरी आवास योजना अंतर्गत मंजूर, पूर्ण व अपूर्ण घरकुलांची माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधिताना दिले आहेत. या कालावधीत जवळपास ९ हजार ५०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ४२०० घरकुल लाभार्थ्यांना १५ हजार रूपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर कांही लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे.
सभापती नागरगोजे यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी पंचायत समितीच्या घरकुल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना गावनिहाय पडताळणी करून मंजूर, सुरू असलेली व अपूर्ण घरकुले यांचा अहवाल तातडीने पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले. या उपक्रमामुळे घरकुल योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर येण्यास मदत होणार असून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासनास आवश्यक कार्यवाही करता येणार आहे. तालुक्यातील घरकुल योजनांची सद्यस्थिती स्पष्ट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
















