लातूर : प्रतिनिधी
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे मोठे जाळे लातूर शहरात असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. त्यानुसार सीबीआयचे पथक या प्रकरणाशी संंबंधित लातूर शहरातील डॉक्टरांची कसून चौकशी करीत आहे. काल डॉ. शिरुरे यांच्या पत्नी, नातेवाईक आणि डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची झाडाझडती घेतल्यानंतर दि. २२ मे रोजी सीबीआयच्या पथकाने डॉ. मनोज देशमुख व डॉ. विनोद स्वामी यांच्या हॉस्पिटलवर धाड टाकून त्यांची कसून चौकशी केली.
शहरातील जुना औसा रोडवरील डॉ. मनोज देशमुख यांच्या देशमुख हॉस्पिटलवर सीबीआयने धाड टाकली. डॉ. मनोज देशमुख यांनी स्वत:च्या लाभासाठी नीटचा पेपर विकत घेतला, असा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे सीबीआयने डॉ. देशमुख यांची कसून चौकशी करीत काही पुरावे ताब्यात घेतल्याचे कळते.
दरम्यान सीबीआयच्या पथकाने शहरातील दयानंद महाविद्यालय गेटच्या परिसरातील डॉ. विनोद स्वामी यांच्या स्वामी बालरोग व स्कीन क्लिनिकवर धाड टाकली. डॉ. स्वामी यांनी त्यांच्या मुलासाठी नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे सीबीआयने डॉ. स्वामी यांची चौकशी करुन काही कागदपत्र, मोबाईल फोनचा डाटा, मेमरी कार्ड जप्त केल्याचे सांगण्यात आले. सीबीआयच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत शहरतील डॉ. मनोज शिरुरे, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. मनोज देशमुख व डॉ. विनोद स्वामी या चार डॉक्टरांची कसून चौकशी केली आहे.
















