लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील खंडापूर येथे दि. २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत पार पडलेला उत्सव संतांचा, कुंभमेळा वारक-यांचा पादुका दर्शन सोहळ्यासाठी देणगी स्वरूपात आलेल्या रकमेमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार किशोर जाधव व अन्य आयोजकांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर अटकेची कार्यवाही करून आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवार दि. २२ मे रोजी लातूर शहरातील गांधी चौकात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या पादुका दर्शन सोहळ्यात कोट्यावधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ुमन राईट मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे लातूरच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. सोहळ्यासाठी अंदाजे ३७०० देणगी पुस्तिका छापण्यात आल्या होत्या. प्रत्येक देणगी पावती ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची आहे. या सोहळ्यासाठी छोटे कदम माऊली महाराज व तोतया भामटा किशोर जाधव शिवणीकर हे संपूर्ण मराठवाड्यात फिरून लोकांकडून मदत, पैसे गोळा करत होते. या सोहळ्यासाठी सामान्य नागरिकांसह विविध संस्था, राजकीय पुढा-यांनीही मोठ्या रकमा देणगी स्वरूपात दिल्या आहेत. तसेच दानपेटीच्या माध्यमातूनही अंदाजे ५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. पावती पुस्तकांच्या माध्यमातूनही किमान १८ कोटी ५० लाख रुपये जमा झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. औसा येथे धान्य विक्रीतून ४० लाख रुपये आल्याचा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे.
या धरणे आंदोलनात अमोल नानजकर, अॅड. राणीताई स्वामी, पृथ्वीराजसिंह पाटील, नेताजी जाधव, काशीबाई हांडे, योगीताताई ठाकूर, रामेश्वर डोणे, अमोल भालेराव, भीमराव वराडे, पृथ्वीराज पवार, पंडितराव लखनगिरे, अमर कैले, बप्पा टेळे, सुरेश जाधव, सुरेखा गाडेकर, संतोष तुरूप, टीनाताई शिंदे, शाहीर शिंदे, महेश पाटील, नागेश जाधव, दिनेश कांबळे, तुषार रेड्डी, गोपाळ माळी यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
















