नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तीव्र युद्धामुळे जगावर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाची आणि आर्थिक मंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ हा जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग जर २०२६ अखेरपर्यंत बंद राहिला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रतिबॅरल तब्बल २०० डॉलरवर पोहोचू शकते, असा गंभीर इशारा ‘वूड मॅकेन्झी’ या जागतिक नामांकित संस्थेने आपल्या ताज्या अहवालात दिला आहे. या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारात एकच खळबळ माजली असून, इराणनेही यापूर्वी जगाला अशाच प्रकारच्या भीषण परिस्थितीचा इशारा दिला होता.
हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या कोंडीमुळे आखाती देशांतून (खाडी देश) जगाला होणारा रोजचा १.४ कोटी बॅरल तेलपुरवठा आणि जगातील २० टक्के एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. ही परिस्थिती जर अशीच कायम राहिली, तर जागतिक अर्थव्यवस्था ०.४ टक्क्यांनी घसरू शकते. मात्र, या अभूतपूर्व संकटामुळे जगातील अनेक देश आता पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करून अपारंपरिक ऊर्जा आणि ‘इलेक्ट्रिक वाहनांकडे’ (EV) अत्यंत वेगाने वळण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
‘वूड मॅकेन्झी’ने कच्च्या तेलाच्या दरांबाबत आणि जागतिक परिस्थितीबाबत तीन संभाव्य स्थिती मांडल्या आहेत. पहिल्या सकारात्मक स्थितीनुसार, जर येत्या जून महिन्यापर्यंत हे युद्ध मिटले, तर तेलाचा दर २०२६ अखेरपर्यंत प्रतिबॅरल ८० डॉलर आणि २०२७ मध्ये ६५ डॉलरपर्यंत खाली येईल. दुसऱ्या मध्यम स्थितीनुसार, जर हे वाद उन्हाळ्यापर्यंत रेंगाळत राहिले, तर पुरवठा विस्कळीतच राहील आणि जगात सौम्य मंदीचे सावट येईल. तिसऱ्या आणि अतिशय वाईट स्थितीनुसार, जर हॉर्मुझ सागरी मार्ग २०२६ च्या अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहिला, तर तेलाची मागणी घटूनही दरांचा प्रचंड भडका उडेल. अशा स्थितीत कच्चे तेल थेट २०० डॉलरवर पोहोचेल, ज्यामुळे संपूर्ण जगात तीव्र आर्थिक मंदी येण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
















