मुंबई : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या १० दिवसांतील ही तिसरी दरवाढ असून यामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत, म्हणजेच १९ मे रोजी पुन्हा ९० पैशांनी दर वाढले. आता आज, २३ मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल ८७ पैसे तर डिझेल ९१ पैशांनी महाग केले आहे. या सलग तीन दरवाढींमुळे अवघ्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल ५ रुपयांपर्यंत महागले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्याने ही दरवाढ करावी लागत असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.
नवीन दरवाढीनंतर मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव १०८ रुपये ४९ पैशांवर पोहोचला आहे, तर डिझेलसाठी ९५ रुपये २ पैसे मोजावे लागत आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल ९९ रुपये ५१ पैसे आणि डिझेल ९२ रुपये ४९ पैसे प्रति लिटर झाले आहे. महाराष्ट्रातील इतर प्रमुख जिल्ह्यांचा विचार केला तर लातूर, नांदेड आणि परभणी या भागात स्थानिक करांमुळे पेट्रोलचा दर आधीच १०९ रुपयांच्या पार गेला होता, जो या नव्या वाढीनंतर आता प्रति लिटर ११० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
दुसरीकडे, इंधनाच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि पुरवठ्याबाबत समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या अफवांमुळे गेल्या काही दिवसांत पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांकडून डिझेल खरेदीसाठी पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला आवाहन केले आहे की, राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊन गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्हा प्रशासनाला साठेबाजी रोखण्याचे आणि शेतकऱ्यांना सुरळीत पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून, सर्वसामान्य नागरिकांना आता महागाईच्या आणखी एका मोठ्या फटक्याला सामोरे जावे लागणार आहे.
















