जळकोट : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. वेळेवर पेरणी झाल्यानंतर सोयाबीन पीक जोमाने वाढले. अनेक शेतांमध्ये सोयाबीनला शेंगा लागून पीक काढणीच्या उंबरठ्यावर आले होते. मात्र, ऐन शेंगा भरण्याच्या आणि दाणे पक्व होण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून जळकोट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात यंदा सोयाबीनची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे सोयाबीनची वाढ चांगली झाली होती. काही ठिकाणी पिकाची वाढ समाधानकारक होऊन शेंगाही चांगल्या प्रमाणात लागल्या. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी शेतक-यांना अपेक्षा होती. मात्र, पिकाला अत्यंत गरजेच्या असलेल्या काळात पावसाने मोठा खंड दिल्याने शेतक-यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.
















