रेणापूर : पावसाने पाठ फिरवल्याने रेणापूर तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली असून, सुमारे ४८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. विशेषत: सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, मूग, उडीद आणि तुरीचीही वाढ खुंटली आहे. पिकांसाठी केलेला बियाणे, मशागत व लागवडीचा खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी विविध पक्ष, संघटना व शेतक-यांकडून होत आहे.
रेणापूर तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र सुमारे ४८ हजार हेक्टर असून, यापैकी ४७ हजार ६११ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती. यात सर्वाधिक ४४ हजार ७६९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. सुरुवातीला अधूनमधून झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण व वाढ झाली. मात्र त्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली.पावसाचा तब्बल ४० दिवसांचा खंड पडल्याने सोयाबीनसह मूग व उडदाची पिके पाण्याअभावी माना टाकून अनेक भागांतील सोयाबीन पिके करपली असून तुरीची वाढही खुंटली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतक-यांनी केलेला बियाणे, खत, मशागत व पेरणीचा खर्चही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती उलट झाली आहे. मोजक्या पावसाच्या भरवशावर पेरणी केलेली खरीप पिके आता डोळ्यांसमोर करपत असल्याने शेतक-यांमध्ये चिंता वाढली आहे. उत्पन्नाचे साधनच धोक्यात आल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
















