देवणी : तालुक्यात खरीप हंगामातील अंतिम पिक पेरणी अहवालानुसार एकूण लागवडीयोग्य ३६ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रापैकी ३५ हजार ६४ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून पेरणीची टक्केवारी ९६.४५ टक्के झाली आहे. मात्र, पावसाचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत कमी राहिल्याने पेरणी झाल्यानंतरही पिकांच्या वाढीचा प्रश्न निर्माण झाला असून तालुक्यावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट कायम आहे.
महसूल मंडळनिहाय पाहता देवणी मंडळात १३ हजार ६२२ हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी १३ हजार २७४ हेक्टरवर पेरणी झाली असून पेरणीची टक्केवारी ९७.४५ आहे. वलांडी मंडळात १२ हजार २०१ पैकी ११ हजार ८०३ हेक्टरवर, तर बोरोळ मंडळात १० हजार ५३२ पैकी ९ हजार ९८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वलांडीची पेरणी ९६.७४ टक्के, तर बोरोळची ९४.८३ टक्के आहे. तालुक्यात यंदाच्या खरीप पिकांमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. एकूण २५ हजार १७० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. याशिवाय तुरीचे ६ हजार ५२९ हेक्टर, कापसाचे २ हजार ९२२ हेक्टर, उडदाचे ११९ हेक्टर, मुगाचे १६७ हेक्टर, मक्याचे १०० हेक्टर क्षेत्र आहे.
















