औसा : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या औसा तालुक्यातील शेतक-यांच्या पदरी यंदाही निराशाच आली आहे. खरीप हंगामातील सोयाबीनसह तूर, मूग, उडीद आदी पिके पावसाअभावी करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने शेतशिवारातील हिरवाई आता नाहीशी झाली असून, अनेक ठिकाणी उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी पाणी नाही आणि हातातोंडाशी आलेला घास वाचण्याची आशाही मावळत चालल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: हताश झाला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात औसा तालुक्यात ९६ हजार ८४५.७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १ लाख १ हजार ७०६.६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच पेरणीचे क्षेत्र १०५ टक्क्यांवर गेले. मात्र, पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी त्यानंतर पावसाने साथ सोडल्याने आता या पिकांचे भवितव्यच धोक्यात आले आहे.
सोयाबीनचे क्षेत्र मोठे; पण पिके तहानलेली
तालुक्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ६४ हजार ८०८.८० हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी तब्बल ९२ हजार ६१६ हेक्टरवर झाली. सोयाबीनच्या विक्रमी पेरणीनंतर शेतक-यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, पावसातील मोठ्या खंडाने या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. सध्या अनेक भागांत सोयाबीन पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतानाच जमिनीतील ओलावा संपत चालला आहे. पाने सुकली आहेत, फुले व शेंगा गळाल्या आहेत. काही ठिकाणी पिके अक्षरश: करपून गेल्याचे चित्र आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता नव्हे तर उत्पादनच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तुरीची ६ हजार ७९० हेक्टरवर, मुगाची ६५४ हेक्टरवर तर उडदाची ७४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या पिकांवरही पावसाच्या खंडाचा परिणाम झाला आहे. तुरीची वाढ खुंटली असून, मूग व उडदाच्या पिकांनाही पाण्याची गरज आहे. खरीप हंगामातील विविध पिके पावसाच्या प्रतीक्षेत असताना शेतक-यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतक-यांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले संकट पेरणी, बियाणे, खत, औषध फवारणी, मशागत यासाठी शेतक-यांनी मोठा खर्च केला. पिके हातातोंडाशी येण्याची वेळ असतानाच पावसाने दगा दिल्याने केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पिके करपली, दुसरीकडे वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा बोजा; अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
















