जिंतूर : (अजमत पठाण)
शहरातील अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणारी आणि शिक्षणाचा समृद्ध वारसा लाभलेली जुनी जिल्हा परिषद शाळेची इमारत आज अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. ही इमारत मद्यपी, गांजा सेवन करणा-यांचा अड्डा बनली असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. या शाळेच्या शेजारीच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मुलींचे निवासी वसतीगृह असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने गटशिक्षणाधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
एकेकाळी या शाळेच्या इमारतीत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर घडले. मात्र शाळेची इमारत जीर्ण झाल्यानंतर नवीन इमारतीत शाळेचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर रिकाम्या पडलेल्या या इमारतीत सायंकाळनंतर परिसरातील मद्यपी, गांजा सेवन करणारे युवक तसेच समाजकंटकांचा वावर वाढला असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. संबंधित जीर्ण इमारत तातडीने पाडून टाकावी किंवा संपूर्ण परिसर सुरक्षित कुंपण घालून बंद करावा अशी मागणी होत आहे. तसेच या भागात नियमित पोलिस गस्त वाढवून मद्यापी, गांजा सेवकांवर कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची गस्त सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे येथून गटशिक्षणाधिकारी कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे वेळेत लक्ष का दिले नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. एखादी अनुचित घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि पोलिस प्रशासन याची गांभिर्याने दखल घेणार का याकडे जिंतूरकरांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थीनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या जीर्ण इमारतीच्या लगतच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मुलींचे निवासी वसतिगृह तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ कार्यरत आहे. दररोज शेकडो विद्यार्थिनी, महिला शिक्षिका आणि कर्मचारी या मार्गाने ये-जा करतात. सायंकाळच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या वावरामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा आरोप शिक्षक व स्थानिक नागरिकांनी केला आहे.
















