मुंबई : प्रतिनिधी
आजची नवी पिढी आता थेट व्यवस्थेला प्रश्न विचारू लागली आहे. त्यांना हिंदू-मुस्लिम द्वेष किंवा भावनिक राजकारण नकोय, तर त्यांना चांगले रस्ते आणि शाळेत शिक्षक हवे आहेत, अशा शब्दांत राज्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत सोशल मिडीयावर विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर करत सद्यपरिस्थिती मांडली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या वाढत्या जागरूकतेकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी पोस्टमध्ये राज्यातील चार प्रमुख उदाहरणे दिली आहेत. त्यामध्ये नाशिक (त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी, गोहिरेवाडी): येथील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटलीचा माईक बनवून रस्त्यांच्या दुरवस्थेचे अनोख्या पद्धतीने रिपोर्टिंग केली आहे. तर दुस-या उदाहरणामध्ये रायगड (कोंडिवडे) येथील दोन विद्यार्थिनींनीही नाशिकच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रयोग करून गावातील रस्त्यांचे प्रश्न मांडले. तिस-या घटनेत नागपूर (ग्रामीण) येथे शाळेत जाण्यासाठी एसटी बस सुरू करा, अशी आक्रमक मागणी करत विद्यार्थिनी थेट पुढे आल्या आहेत. हिंगोली (वसमत) येथे विद्यार्थ्यांनी आमचा सत्कार करण्यापेक्षा आम्हाला शाळेत शिक्षक द्या, असे हिंगोलीच्या शिक्षणाधिका-यांना ठणकावून सांगणा-या मुलींनी व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.
ही केवळ आंदोलने नाहीत, नवी जनजागृती
या घटनांचा संदर्भ देत वडेट्टीवार म्हणाले की, ‘‘ही केवळ मुलांची छोटी-मोठी आंदोलने नाहीत, तर ही नव्या पिढीची जनजागृती आहे. या ‘जेन अल्फा’ पिढीला ट्रोलिंग नको, हिंदू-मुस्लिम द्वेष नको, धमक्या आणि दंडेलशाही नकोय. त्यांना चांगले रस्ते, शाळेत शिक्षक, सुरक्षित प्रवास, दर्जेदार शिक्षण आणि मूलभूत सुविधा हव्या आहेत.
द्वेषाच्या राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करा
सरकारला थेट इशारा देताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने आता ठरवावे की त्यांना ख-या मुद्द्यांवर बोलायचे आहे की मुद्दे टाळण्यासाठी समाजाला केवळ भावनिक वादात अडकवून ठेवायचे आहे? कारण ही पिढी आता प्रश्न विचारायला शिकतेय आणि ती सत्तेकडे उत्तर मागतेय. जर या मुलांच्या प्रश्नांकडे आता दुर्लक्ष केले, तर उद्या हीच पिढी मतपेटीतून सरसकट उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. द्वेषाच्या राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करा. या मुलांना गृहीत धरू नका, त्यांच्या शिक्षणाकडे आणि नागरी सुविधांकडे लक्ष द्या, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
















