वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. कॅलिफोर्नियातील एका ज्युरीने टॅल्क-आधारित बेबी पावडरच्या वापरामुळे दोन महिलांना ओव्हेरियन कर्करोग झाल्याचा ठपका ठेवत कंपनीला ४० दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच सुमारे रु. ३६२ कोटींची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
लॉस एंजेलिस सुपीरियर कोर्टाच्या ज्युरीने मोनिका केंट यांना १.८ कोटी डॉलर्स, तर डेबोरा शुल्ट्ज आणि त्यांच्या पतीला २.२ कोटी डॉलर्स देण्याचा आदेश कंपनीला दिला आहे. ज्युरीच्या मते, टॅल्क उत्पादनांशी संबंधित धोक्याबाबत कंपनीला अनेक वर्षांपासून माहिती होती, मात्र ग्राहकांना कोणतीही स्पष्ट सूचना किंवा इशारा देण्यात आला नव्हता.
सध्या जॉन्सन अँड जॉन्सनवर ६७,००० पेक्षा अधिक टॅल्क-संबंधित खटले प्रलंबित आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणे ओव्हेरियन कर्करोगाशी संबंधित असून, काही प्रकरणे मेसोथेलियोमासारख्या गंभीर कर्करोगाशी संबंधित आहेत.
कंपनीने २०२० मध्ये अमेरिकेत टॅल्क-आधारित बेबी पावडरची विक्री बंद केली होती आणि त्याऐवजी कॉर्नस्टार्च-आधारित उत्पादन बाजारात आणले होते. अलीकडेच कोर्टाने कंपनीची दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे सेटलमेंट करण्याची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे येत्या काळात जॉन्सन अँड जॉन्सनसमोर आणखी मोठ्या कायदेशीर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.
















