नवी दिल्ली : पूर्वी गुडघेदुखी किंवा ‘ऑस्टियोआर्थराइटिस’ हा केवळ वृद्धांचा आजार मानला जात असे. मात्र, बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे आता ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य माहिती, वेळीच केलेले निदान आणि जीवनशैलीत बदल करून या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
ऑस्टियोआर्थराइटिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये गुडघ्याच्या सांध्यातील ‘कार्टिलेज’ (कूर्चा) हळूहळू झिजू लागते. हे कार्टिलेज हाडांमध्ये कुशनसारखे काम करते आणि त्यांना एकमेकांशी घासण्यापासून वाचवते. जेव्हा हे कार्टिलेज झिजते, तेव्हा हाडे एकमेकांवर आदळतात. त्यामुळे तीव्र वेदना, सूज आणि चालण्या-फिरण्यात अडथळे निर्माण होतात. गुडघेदुखी सुरुवातीला चालताना किंवा पाय-या चढताना होणारी ही वेदना नंतर विश्रांती घेतानाही जाणवू लागते. गुडघ्यात कडकपणा : सकाळी उठल्यावर किंवा बराच वेळ बसून राहिल्यास गुडघे आखडल्यासारखे वाटणे. गुडघ्याभोवती वारंवार सूज येणे. गुडघे वाकवताना हाडांमधून आवाज येणे.
गुडघ्याभोवतीचे स्रायू कमकुवत झाल्यामुळे चालताना तोल जाणे. जर गुडघेदुखी २-३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, चालताना त्रास होत असेल किंवा सूज येत असेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरुवातीच्या काळात उपचार केल्यास शस्त्रक्रियेशिवाय हा आजार रोखता येऊ शकतो.
कमी वयात ऑस्टियोआर्थराइटिस होण्याची कारणे
वाढते वजन (लठ्ठपणा), जुनी दुखापत, व्यायामाचा अभाव, अनुवांशिकता, व्हिटॅमिन-डी ची कमतरता आणि तासनतास एकाच जागी बसून काम करणे (डेस्क जॉब) ही या आजाराची मुख्य कारणे आहेत. प्रामुख्याने ४० वर्षांनंतर महिलांमध्ये आणि खेळाडूंमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते.
आहार आणि जीवनशैलीत करा ‘हे’ बदल
१. काय खाणे टाळावे?
तळलेले आणि मसालेदार पदार्थ.
पॅकेज्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि अति साखरेचे पदार्थ.
मैदा, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि रेड मीट.
मिठाचा अतिवापर.
२. काय खावे?
हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा, कडधान्ये, कमी फॅट असलेले दूध-दही, हळद, आले आणि मासे यांचा आहारात समावेश केल्यास सांधे निरोगी राहण्यास मदत होते.
३. प्रतिबंधात्मक उपाय
वजन नियंत्रण: वजन कमी केल्यास गुडघ्यांवरील ताण कमी होतो. नियमित व्यायाम: मॉर्निंग वॉक, सायकलिंग आणि पोहणे यांसारखे हलके व्यायाम करा. स्ट्रेंथ ट्रेनिंग: मांड्यांचे स्रायू मजबूत केल्यास गुडघ्यांना चांगला आधार मिळतो. पोश्चर सुधारा: जास्त वेळ एकाच ठिकाणी बसू नका; दर ४० मिनिटांनी थोडे चाला. तसेच चालताना आरामदायक शूजचा वापर करा.
















