लातूर : प्रतिनिधी
शहरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसात खोरी गल्ली परीसरात एक दुर्दैवी घटना घडली. नाल्याच्या पाण्यात एक महिला आणि दोन लहान मुले वाहून गेली होती. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे तात्काळ त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर या घटनास्थळी भेट देवून महापौर जयश्रीताई सोनकांबळे आणि स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी या नाल्याची पाहणी करत तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेले आहेत. याप्रसंगी आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपमहापौर स्नेहल उटगे यांच्यासह प्रभागातील नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास लातूर शहरासह परिसरात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे खोरी गल्ली परिसरातील नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. या नाल्यांवर झाकण नसल्यामुळे त्या वाहत्या पाण्यात एक महिला व दोन लहान मुले दुचाकीसह वाहून गेले. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या तिघांनाही तात्काळ पाण्यातून बाहेर काडून रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी तात्काळ रुग्णालयात जावून त्या महिलेसह दोन मुलांची भेट घेतली तसेच डॉक्टरांना उपचाराबाबत योग्य सूचनाही दिल्या.
सदर दुर्दैवी घटना नाल्यावर झाकण नसल्याने घडली असल्यामुळे सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी महापौर जयश्रीताई सोनकांबळे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे व आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी खोरीगल्लीतील घटनास्थळी भेट देवून त्या नाल्याची पाहणी केली. यावेळी नागरीकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच आगामी काळात या दुर्देवी घटनेची पुर्नरावृत्ती होवू नये याकरिता त्या नाल्यावर ठिकठिकाणी झाकणं बसविले आहेत. मात्र या नाल्याची दुरुस्ती तात्काळ करून हा नाला वरुन बंद करण्याचे काम सुरु करण्यात यावेत, असे निर्देश महापौर सौ. सोनकांबळे व सभापती बंडापल्ले यांनी प्रशासनास दिले आहेत.
यावेळी मनपा परिवहन समिती सभापती फैजलखान कायमखानी, नगरसेवक इसरार सगरे, योगेश स्वामी, नगरसेविक सौ. सपना किसवे, तबस्सुम शेख, आदींसह अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, नगर अभियंता उषा शिंदे-काकडे, अभियंता प्रविण चिद्रे, स्वच्छता निरीक्षक आक्रम शेख, सहाय्यक स्वच्छता निरिक्षक मगर यांच्यासह पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















