दिवाळीत फटाके फोडण्याऐवजी पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या सेलिब्रिटी मोहिमेला आता राजकीय वळण लागले आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, स्वप्नील जोशी आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही मुंबईकरांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. मात्र, दिया मिर्झाचा व्हीडीओ महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध होताच भाजपने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर महापालिकेने हा व्हीडीओ हटविल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दिया मिर्झा हिने स्वत:हून महापालिकेला कोणतेही मानधन न घेता हा व्हीडीओ पाठवला होता. पालिकेच्या विनंतीनंतर तिने हा संदेश रेकॉर्ड करून पाठविल्याचे सांगितले जाते. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.२५ वाजता महापालिकेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर हा व्हीडीओ प्रसिद्ध करण्यात आला. दिवाळी साजरी करताना पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घ्यावी,
फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण सर्वांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे आवाजाऐवजी आनंदाने दिवाळी साजरी करा, असे आवाहन दिया मिर्झाने केले होते. मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सोशल मीडियावर या आवाहनाला आक्षेप घेतला. दिया मिर्झाकडून दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे घेण्याची मुंबईकरांना गरज नाही. आपल्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजल्या आहेत, अशी भूमिका अमित साटम यांनी मांडली. त्यानंतर महापालिकेने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून दिया मिर्झाचा व्हीडीओ हटवला. या प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही नाराजी व्यक्त केली. दिया मिर्झा ‘हिंदुत्वविरोधी’ असून तिच्या पूर्वीच्या काही भूमिकांचा उल्लेख महापौरांनी केला. नर्मदा प्रकल्प, समान नागरी कायदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाबाबत तिने यापूर्वी विरोधी भूमिका घेतल्याचा दावा रितू तावडे यांनी केला. महापालिकेच्या अधिकृत माध्यमांवरून प्रसिद्ध होणा-या संदेशांची माहिती महापौरांना आधी देण्यात यावी.
यापुढेही कोणत्याही सेलिब्रिटीची निवड करण्यापूर्वी त्यांची नावे आपल्याला कळवावीत, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. तसेच आपल्या मान्यतेशिवाय महापालिकेने कोणतेही सार्वजनिक विधान करू नये, असेही त्या म्हणाल्या. उपमहापौर संजय घाडी यांनी या आक्षेपांपेक्षा वेगळी भूमिका मांडली. फटाके टाळण्याचे आवाहन करण्यात दिया मिर्झाने काहीही चुकीचे सांगितले नाही. मग तिचा व्हीडीओ हटविण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी केलेला व्हीडीओ प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी होता. त्यामध्ये टीका करण्यासारखे नेमके काय आहे? मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने मी तो व्हीडीओ केला होता. प्रदूषण कमी व्हावे आणि लोकांचे आरोग्य योग्य रहावे, यासाठी तो व्हीडीओ केला होता, त्यात खटकण्यासारखे काहीच नव्हते, असे प्रत्युत्तर दिया मिर्झाने दिले. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावरून महापौर आणि सत्ताधा-यांना लक्ष्य केले. महापालिकेने एका व्यक्तीला अधिकृतपणे व्हीडीओ करण्याची विनंती केली, त्या व्यक्तीने व्हीडीओ तयार करून पाठविला. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने तो हटविण्याची मागणी केली.
महापौरांनी नाराजी व्यक्त केली आणि अखेर व्हीडीओ हटविण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी महापौरांच्या वाहनावरील लाल दिवा आणि अधिकृत निवासस्थानावरील खर्चासंबंधीच्या पूर्वीच्या वादांचाही उल्लेख करत महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. भाजपचे काही नेते सर्व मार्ग बंद झाल्यावर कुठल्याही वादाला हिंदू-मुस्लिम वादाचा रंग देऊन जनतेचे चित्त महागाई, बेरोजगारी अशा सर्व प्रश्नांपासून विचलित करतात. भाजपचे नेते मंत्री नितेश राणे यांनी दिवाळीत मुस्लिम दुकानदारांकडून खरेदी करू नका, हिंदू दुकानदारांकडून खरेदी करा असा फतवा काढला. साटम यांना दिया मिर्झाचे आवाहन खटकले. साटम आणि राणे यांनी दिवाळीच्या तोंडावर हिंदू-मुस्लिम वादाची वात पेटवण्याचे मुख्य कारण म्हणजे, देशात सध्या ज्ञानेश कुमार प्रकरणावरून इंडिया आघाडी व सीजेपी यांनी सुरू केलेली आंदोलने व त्याला होणारी गर्दी! साटम, राणे यांची सारी धडपड लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच आहे. महागाई, बेरोजगारी, निवडणुकांमधील पराभव, पर्यावरणाची हानी अशा सर्व प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीचा हा सारा खटाटोप आहे. दुष्काळ असला तरी जमेल तशी दिवाळी आनंदात साजरी करावी लागणार आहे. तेव्हा आनंदात गुणगुणू या, जिया बेकरार है, छायी बहार है, आजा मोरे बालमा, तेरा इंतजार है!
















