भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर आता सुपर एल-निनो प्रवाह सक्रिय होण्याची भीती निर्माण झाली आहे. हा प्रवाह सक्रिय झाल्यास भारतातील मान्सून धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास देशाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेची हवामान संस्था ‘नॅशनल ओशेनिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (नोआ)च्या नव्या अपडेटनुसार हा सुपर एल-निनो मे ते जुलै या कालावधीतच सक्रिय होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागराचे तापमान यंदा मे महिन्यात सामान्यपेक्षा ०.५अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले असून ही उष्णतेची स्थिती संपूर्ण मान्सून हंगामात कायम राहू शकते. गेल्या महिन्यात एल-निनो सक्रिय होण्याची शक्यता ६१ टक्के वर्तवली होती. ती आता वाढून ८२ टक्के झाली आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले की, याचा थेट परिणाम मान्सूनवर होणार असून देशात दुष्काळाचा धोका अधिक वाढणार आहे. ‘नोआ’च्या अहवालानुसार मे ते जुलै दरम्यान सुपर एल-निनो विकसित होण्याची शक्यता ८२ टक्के असून हा प्रभाव डिसेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत म्हणजेच हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची ९६ टक्के शक्यता आहे. तसेच हा एल-निनो तीव्र ते अति तीव्र राहण्याची शक्यता ६७ टक्के आहे. यामुळे भारतात भीषण उष्णतेची लाट आणि कमकुवत मान्सूनचे सावट अधिक गडद झाले आहे. याच्या प्रभावामुळे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियात पाऊस कमी होईल. इंडोनेशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियात ओलावा संपून जंगलांना आग लागण्याचा धोका वाढेल. या हवामानाचा सर्वाधिक फटका उत्तर, पश्चिम आणि मध्य भारताला बसण्याची शक्यता असून येथील शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. मध्य आणि पश्चिम भारतातील चांगल्या पावसाच्या क्षेत्रामध्येही यंदा सामान्यपेक्षा कमी पाऊस होईल.
मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, ग्वाल्हेर, चंबळ, जबलपूर, रीवा, शहरोल, सागर आणि नर्मदापूरम भागामध्ये कमी पावसाचा अंदाज आहे. लडाख, राजस्थानचा काही भाग, तेलंगणा आणि उत्तर भारताच्या काही मर्यादित भागावर मात्र याचा कमी प्रभाव जाणवेल. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे शनिवारी अंदमान आणि निकोबार बेटावर आगमन झाले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असून श्रीविजयपूरमसह अंदमान बेटांच्या विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी मान्सून अगदी वेळेवर दाखल झाला असून त्याचे संकेत सकारात्मक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अंदमान परिसरात ताशी ३५ ते ४५ किमी वेगाने पश्चिमेकडील वारे सक्रिय झाले आहेत. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण झाले असून, आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती वेगाने होणे अपेक्षित आहे. साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा चार दिवस आधी म्हणजेच २६ मे रोजी केरळ किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला असून कोणत्याही चक्रीवादळाचा अडथळा नसल्याने हा प्रवास सुरळीत राहण्याचा अंदाज आहे. ५ जूनपर्यंत मान्सून गोव्यात पोहोचण्याची शक्यता असून ६ जूनला तो कोकणात आणि ७ जूनपर्यंत पुण्यात दाखल होऊ शकतो. यंदा सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावर्षी देशात ८० सेंटीमीटर पावसाचा अंदाज असून दीर्घकालीन सरासरी ८७ सेंटीमीटरच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. एल-निनोच्या वाढत्या तीव्रतेचा थेट परिणाम मान्सूनच्या वा-यांवर होतो. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन दुष्काळाचा धोका वाढणार आहे. विशेषत: खरीप हंगामातील पिकांवर याचे विपरीत परिणाम होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्याची एकूणच हवामानस्थिती पाहता, देशातील जलसाठ्यांचे व्यवस्थापन करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. पावसाची अनिश्चितता आणि वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्यास पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होऊ शकते.
एल-निनोच्या तीव्रतेमुळे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील. पर्जन्यमानातील या घटीमुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची आणि कडाक्याच्या उष्णतेच्या लाटा येण्याची दाट शक्यता आहे. एल-निनोचा हा प्रभाव केवळ पर्जन्यमानापुरता मर्यादित नसून तो अन्नसुरक्षा आणि अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. मान्सून कमकुवत राहिल्यास पाणीटंचाई आणि चाराटंचाईसारखे गंभीर प्रश्न उभे राहतील. एल-निनोच्या स्थितीमुळे भारतीय मान्सूनच्या वितरणात मोठी तफावत निर्माण होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या नैसर्गिक बदलाचा सर्वाधिक फटका उत्तर, पश्चिम आणि मध्य भारताला बसण्याची शक्यता असून या भूप्रदेशात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंडामुळे कृषी उत्पादनात मोठी घट होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये उत्तर भारतातील राज्यांची स्थिती अधिक चिंताजनक राहू शकते. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान ही राज्ये या काळात सर्वाधिक संवेदनशील राहतील. या भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहण्याची शक्यता असल्याने तेथील खरीप पिकांच्या काढणीवर आणि रबीच्या पेरणीवर संकटाचे ढग जमा होत आहेत. जागतिक हवामान बदलामुळे पावसाच्या वितरणाची नैसर्गिक पद्धत पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
जगाच्या अनेक भागात पावसाचे प्रमाण वाढूनही जमीन मात्र ओलावा टिकवून ठेवण्यास असमर्थ ठरत आहे. पूर्वी पाऊस वर्षभरात ठराविक काळ आणि समान प्रमाणात विभागलेला असायचा, त्यामुळे जमिनीला पाणी शोषणास पुरेसा वेळ मिळत असे. मात्र, आता पावसाचे स्वरूप बदलले असून तो अत्यंत कमी वेळात मोठ्या आणि तीव्र वादळी स्वरूपात कोसळत आहे. अशा प्रकारच्या अतिवृष्टीच्या दोन कालखंडामध्ये मोठा ‘कोरडा काळ’ निर्माण होत आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे पावसाचे दिवस कमी झाले असले तरी पडणा-या पावसाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. जमीन पाणी शोषणास असमर्थ ठरत आहे. जेव्हा एकाच वेळी प्रचंड वेगाने पाऊस पडतो, तेव्हा मातीला इतक्या मोठ्या प्रमाणावर कोसळणारे पाणी शोषून घेण्यास अवधी मिळत नाही. परिणामी हे पाणी जमिनीच्या पोटात जाण्याऐवजी वेगाने वाहून जाते. हे पाणी नद्या, नाल्यांद्वारे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होत नाही. अतिवृष्टी होऊनही ‘कोरड्या दुष्काळाची’ परिस्थिती निर्माण होते.
















