नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावे वगळण्याची मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिर्कायांकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्या सदोष असल्याने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दोन्ही विधानसभा मतदारसंघात जवळपास ७६ हजारांहून अधिक दुबार नावे आहेत.
ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१,५५६ दुबार नावे तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३५ हजाराच्या आसपास दुबार नावे आहेत. विशेष म्हणजे ऐरोलीतही तीच नावे व बेलापुरातही तीच नावे आहेत. म्हणजेच सकाळी एकीकडे मतदान करा व दुपारनंतर दुसरीकडे मतदान करा, असा प्रकार होत असल्याचा दाट संशय आहे.
इतकेच नाही तर एकाच नोडमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातही तीच तीच नावे दोन ते तीन वेळा पहावयास मिळतात. नजरचुकीने म्हटल्यास शंभर-दोनशे, फारफार तर हजार पाचशे मतांचा गोंधळ होऊ शकतो. परंतु ७६ हजार मतांपेक्षा अधिक घोळ हे नियोजित षडयंत्र आहे. दुबार नावे मतदारयादीत घुसवून आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याची ही खेळी आहे व त्यासाठीच प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा संशय रवींद्र सावंत यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.
















