मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्याचा सामूहिक निर्धार आपण सर्वांनी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याने यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज वरळी डोम येथे ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या युवा शक्तीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून भारताला आतून कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ड्रग्ज हे या छुप्या युद्धातील सर्वांत धोकादायक शस्त्र असून, त्याविरोधातील लढा प्रत्येक नागरिकाने स्वत:चा समजून लढला पाहिजे.
अमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी पोलिस, आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. ड्रग्जची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. विशेषत: शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणा-या टोळ्यांचा संपूर्ण नायनाट केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान लोकचळवळ बनवूया : मंत्री मंगलप्रभात लोढा
‘ड्रग फ्री मुंबई’ हे केवळ शासनाचे अभियान नसून समाजाच्या सक्रिय सहभागातून उभी राहणारी व्यापक जनचळवळ असल्याचे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. मुंबई पूर्णपणे अमली पदार्थमुक्त होईपर्यंत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असून, प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
















