नांदेड : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. नांदेड शहराची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ९२ टक्के क्षमतेने भरून तुडुंब झाला आहे. प्रकल्पात पाण्याचा येवा सातत्याने सुरू असल्याने कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा पावसाळ्याच्या जून आणि जुलै महिन्यांच्या शेवटापर्यंत पावसाने मोठी ओढ दिली होती. त्यामुळे पिकांची स्थिती आणि शहराचा पाणीपुरवठा यांबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलैच्या अखेरच्या चार-पाचदिवसांत निसर्गाने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. ३१ जुलै रोजी सकाळी विष्णूपुरी प्रकल्पात ४२.२७% जलसाठा (३६.९१ दशलक्ष घनमीटर पाणी) उपलब्ध होता.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकाच दिवसात तब्बल ६.७४ दशलक्ष घनमीटर पाण्याचा नवा साठा जमा झाला. दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी प्रकल्प ९२% भरल्याची नोंद झाली असून, पाण्याची आवक अजूनही अखंड सुरू आहे. प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे गोदावरी नदीच्या खालच्या बाजूस असणा-या सर्व गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
















