निलंगा : लक्ष्मण पाटील
एस.टी. महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. ३) निलंगा आगारासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. वर्षानुवर्षे मागण्या प्रलंबित राहिल्याने कामगारांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन, २०१६ पासूनची वेतनवाढ, घरभाडे भत्त्याची थकबाकी, २०१८ पासूनचा महागाई भत्ता, सध्याचा ५८ टक्के महागाई भत्ता ६० टक्के करणे, तसेच २५ हजार रुपये दिवाळी भेट आणि १२ हजार ५०० रुपये सण उचल देण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आगार सचिव अंकुश काळे यांनी शासनाने मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. बुधवारी (दि. ४) आगारात द्वारसभा, तर गुरुवारी (दि. ५) राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात आगार अध्यक्ष प्रल्हाद विठूबोने, सी. सी. एस. बँकेचे संचालक उद्धव गौण्डगावे, रामराजे कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कामगार सहभागी झाले होते. एस.टी. कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर शासन नेमका कधी निर्णय घेणार, असा सवाल या आंदोलनातून उपस्थित झाला आहे.
















