वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट-यूजीची परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुन्हा एकदा नापास झाली. यंदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या अहवालानंतर ३ मे रोजी घेण्यात आलेली नीट-यूजी २०२६ ची परीक्षा मंगळवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे देशभरातील लाखो वैद्यकीय प्रवेशेच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढली असून त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. एनटीएने ‘एक्स’वर प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विश्वास कायम राखण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीएने ३ मे रोजी ही परीक्षा भारतातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये घेतली होती. सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
पेपरफुटी आणि इतर अनियमिततांच्या आरोपांची चौकशी आता सीबीआयकडे सोपविण्यात आली असून एनटीए या तपासात पूर्ण सहकार्य करणार आहे. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) ‘गेस पेपर’ या प्रकरणाचा प्राथमिक तपास केला आहे. परीक्षेपूर्वी सुमारे ४१० प्रश्नांचा एक ‘गेस पेपर’ विद्यार्थ्यांमध्ये फिरत होता असा दावा केला जात आहे की, यातील सुमारे १२० प्र्रश्न केमिस्ट्रिशी संबंधित होते. हा पेपर परीक्षेच्या १५ ते ३० दिवस आधीच उपलब्ध झाला होता, ज्याची आता सखोल चौकशी केली जात आहे. बिहारमध्ये नीट परीक्षेत सॉल्वर टोळी सक्रिय होती आणि ६० लाख रुपयांमध्ये एका जागेचा सौदा झाला होता. परीक्षेच्या आधी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला होता. याचा सूत्रधार एक एमबीबीएसचा विद्यार्थी होता. नालंदा पोलिसांनी टोळीतील ७ जणांना अटक केली होती. पोलिसांच्या तपासात असे आढळले की ही टोळी नीट परीक्षा पास करून देण्यासाठी एका उमेदवाराकडून ५० ते ६० लाख रुपयांपर्यंत वसूल करणार होती. यापैकी १.५ ते २ लाख रुपये आगाऊ म्हणून घेतले जात होते. यानंतर परीक्षा केंद्र्रावर मूळ उमेदवाराऐवजी सॉल्वर बसवण्याची तयारी केली जात होती.
मास्टरमाईंडने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी औरंगाबाद, जमुई आणि मुजफ्फरपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकून आणखी ४ आरोपींना अटक केली होती. मुख्य आरोपीला अटक झाल्यामुळे संपूर्ण टोळीच्या मनसुब्यांवर पाणी पेरले गेले. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपीला नाशिक क्राईम ब्रँच युनिट २ ने ताब्यात घेतले आहे. राजस्थानचे तपास पथक आल्यानंतर संशयिताला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राजस्थान पोलिसांनी देशभरातून १६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिसांनी बीएएमएसच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या ३० वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. संशयित मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवासी आहे. त्याने डोक्याचा चमनगोटा करून वेश बदलला होता. नीट परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ दिल्लीत मंगळवारी एनएसयूआयतर्फे शास्त्री भवनाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलकांच्या हातात ‘पंतप्रधान तडजोड करतात, पेपरमध्येही तडजोड होते’, ‘पेपरमध्ये लीक, मोदी सरकार वीक’ आणि ‘डॉक्टरची पदवी विक्रीला आहे’ अशा आशयाचे फलक होते. आंदोलक ‘विद्यार्थ्यांवरील अत्याचार थांबवा’ अशा घोषणा देत होते.
नीटचा पेपर फुटल्याच्या आरोपांची जबाबदारी स्वीकारत एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी या परीक्षेच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक पुढील ७ ते १० दिवसांत जाहीर केले जाईल, असे घोषित केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया विस्कळीत होऊ नये या दृष्टीने पुढील प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. फेरपरीक्षा अत्यंत कमी कालावधीत घेऊन निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. जुनाच डेटा वापरला जाईल, नोंदणी तपशील आणि उमेदवारी तशीच पुढे नेली जाईल. पूर्वी निवडलेली परीक्षा केंद्रे वैध राहतील, कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. नवीन परीक्षेपूर्वी नवीन प्र्रवेशपत्रे जारी केली जातील. नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचा तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी आता ‘विष काळ’बनला आहे, असा हल्ला त्यांनी केला. एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणतात, परीक्षा रद्द करून भ्रष्ट भाजप सरकारने २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे कष्ट, त्याग आणि स्वप्ने चिरडून टाकली आहेत.
कोणाच्या वडिलांनी कर्ज काढले होते, तर कोणाच्या आईने आपले दागिने विकले होते. लाखो मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केला, मात्र त्या बदल्यात त्यांना काय मिळाले तर पेपरफुटी, सरकारी निष्काळजीपणा आणि शिक्षणातील संघटित भ्रष्टाचार! ही केवळ सरकारची अकार्यक्षमता नसून तरुणांच्या भविष्याविरोधात केलेला एक मोठा गुन्हा आहे. प्रत्येक वेळी पेपर माफिया मोकाट सुटतात आणि त्याची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावी लागते. जर एखाद्याचे नशीब मेहनतीवरून नाही तर पैसा आणि ओळखीवरून ठरत असेल तर शिक्षणाला काय अर्थ उरतो? पेपरफुटी प्रकरणात नाशिकचा संशयित शुभम खैरनारने १० लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली होती आणि पुढे ती १५ लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये फुटली आणि तिथून ती हरियाणात पोहोचली. हरियाणात या प्रश्नपत्रिकेची १० वेगवेगळे संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर ही साखळी बिहार, आंध्र प्र्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पसरली.
राजस्थानचा ‘मनीष’ हा या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार मानला जात आहे. वर्षभर कठोर मेहनत करून परीक्षा दिल्यानंतर अचानक ती रद्द झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर आपल्या गावी परतले आहेत तर काही सुटीसाठी बाहेरगावी गेले आहेत. फेरपरीक्षेच्या अनिश्चिततेमुळे पुढील नियोजनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्यांनी अत्यंत जिद्दीने आणि प्रामाणिकपणे नीट परीक्षेची तयारी केली त्यांच्या भवितव्याशी खेळ केला गेला आहे. या प्रकरणातील दोषींविरुध्द कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. कटात सहभागी प्र्रत्येकाला कडक शिक्षा मिळाली पाहिजे. या प्रकरणात सरकार आणि प्रशासनातील काही व्यक्तींचा सहभाग असू शकतो. गत आठ वर्षांत १६ वेळा परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. पेपरफुटी प्रकरणाने मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराच्या चिंधड्या उडवल्या आहेत.
















