चाकूर : अ. ना. शिंदे
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला याची खरी प्रचिती आली असुन पंचनाम्याच्या टक्केवारी पेक्षा शेतक-यांच्या डोळ्यातील अश्रूची टक्केवारी जास्त आहे. तालुक्यात ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र पावसाच्या उघडीपीने हिरव्या पिकानी खाली माना टाकल्याअसुन आता ती पिवळी पडून वाळून जात आहेत.
ग्रामपातळीवरील त्रिसमिती थेट शेतक-यांच्या शेतात जाऊन पीक पाहणी करीत आहेत. ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी आणि कृषी सहाय्यक हे तिघेजण पंचनामे करीत आहेत. तालुक्यातील ८३ गावाच्या शिवारात हे पंचनामे सुरू आहेत. पंचनामा करताना ३३ टक्के की, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान हे नमूद करावे लागणार आहे. मात्र हे नुकसान प्रत्यक्षात ५० टक्क्यांपेक्षा ही जास्त असल्याचे दिसत आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे नुकसानीची टक्केवारी पेक्षा ही शेतक-यांची डोळयातील अश्रूची टक्केवारी जास्त आहे. त्या अश्रुत मुलांचे शिक्षण, दवाखाना, कपडे, मुलांची लग्ने लपलेली आहेत. या अश्रुंचाच पंचनामा करून शासन कधी प्रत्यक्षात मदत करेल याची वाट बघत बसावे लागणार आहे.
या पंचनाम्याची किचकट प्रक्रिया असल्याचे प्रत्यक्षात पंचनामा नमुना पाहिल्यानंतर स्पष्ट होते.यात पंचनामा अर्ज, ७/१२,नमुना ८ -अ, चालू वर्षाची ई-पीक पाहणी,आधारकार्ड, फार्मर आयडी, बँक पासबूक, सामायिक क्षेत्रासाठी संमतीपत्र, पिकाचे जिओ टॅगिंग फोटो,मोबाईल नंबर,दोन पंच, बाधीत शेतकरी अशा तिघांची नावे आणि त्या नावा समोर सह्या त्यानंतर ग्रामस्तरीय समीतीच्या सदस्याच्या सह्या घेणे बंधनकारक आहे.अशा विविध कागदपत्रांचा समावेश आहे. यामुळे शेतकरी परेशान झाला असून राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
















