दुष्काळाच्या झळांनी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता शेतक-यांचे लक्ष पीक कापणी प्रयोगाकडे लागले आहे. पीक विमा भरपाई निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातून नोंदविले जाणारे उत्पादन महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मुदतपूर्व तसेच शून्य उत्पादनावर आधारित पीक कापणी प्रयोग करण्याचे निर्देश दिले आहेत.
पीक कापणी प्रयोगात प्रत्यक्ष शेतातील उत्पादनाची मोजणी करून त्याची नोंद केली जाते. त्यामुळे दुष्काळामुळे उत्पादन झाले नसेल तर अहवालातही शून्य उत्पादनाचीच अचूक नोंद होणे आवश्यक आहे. कागदोपत्री उत्पादन दाखवून प्रत्यक्ष नुकसान झाकले जाऊ नये, अशी शेतक-यांची मागणी आहे. पीक पंचनामा आणि कापणी प्रयोगाच्या वेळी शेतकरी उपस्थित असावा, त्याच्या समक्ष उत्पादन मोजावे आणि अहवालातील नोंद दाखवूनच स्वाक्षरी घ्यावी,व आमच्या स्वाक्षरीपूर्वी कापणी प्रयोगाचा निकाल दाखवावा,’’ अशी भूमिका शेतक-यांनी मांडली आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांसाठी पीक विमा भरपाई महत्त्वाची असल्याने पीक कापणी प्रयोग पारदर्शक आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीवर आधारित असावा, अशी मागणी जोर धरत आहे.
















