लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर घडविणा-या बालरंगभूमी परिषदेच्या वतीने लातूरमध्ये आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ या राज्यस्तरीय लोककला महोत्सवाच्या अंतिम फेरीचा उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात समारोप झाला. दि. २ व ३ ऑक्टोबर या दोन दिवशी पार पडलेल्या महोत्सवात राज्यभरातून आलेल्या बालकलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक लोकनृत्य, लोकगीत, आणि लोकवाद्यांच्या अविष्कारांनी उपस्थित लातूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले. लातूरच्या बालकलावंतांनी सर्वाधिक पारितोषीके पटकावून लातूरच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला.
महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास लोककला महासंघाच्या अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, लातूरचा भूमीपुत्र सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर, बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती, महाराष्ट्रच्या अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री ऍड. निलमताई शिर्के-सामंत, राज्य उपाध्यक्ष ऍड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. दीपाताई क्षीरसागर, राज्य कार्याध्यक्ष राजु तुलालवार, राज्य प्रमुख कार्यवाह सतीष लोटके, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, सहकार्यवाह, आसेफ अन्सारी, दिपाली शेळके यांच्यासह मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडस्कर, नागसेन पेंढारकर, सुजय भालेराव, शिवाजी शिंदे, महेश सोनुले, देवीप्रसाद सोहनी, संजय रहाटे, बाळकृष्ण ओडेकर, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, कार्याध्यक्ष मयुर राजापुरे, प्रमुख कार्यवाह प्रा. नवलाजी जाधव यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी विविध लोककलांचे सादरीकरण करणा-यात पारितोषिके अनुक्रमे समूह नृत्यात सर्वोत्कृष्ट-अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी प्राथमिक शाळा, नंदुरबार उत्कृष्ट- ज्ञानदा प्रशाला किरकिटवाडी, पुणे उत्तम-संत ज्ञानेश्वर विद्यालय, नाशिक प्रशंसनिय-केशवराज रेनीसन्स विद्यालय, लातूर व श्रीमती सावित्रीदेवी थिरानी विद्यालय, ठाणे यांनी पटकावले. समूह गायनात सवोत्कृष्ट हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर उत्कृष्ट पराग विद्यालय, बृहन्मुंबई उत्तम ज्ञानप्रकाश संगीत विद्यालय, लातूर प्रशंसनिय होरायझन अकॅडमी,कउरए नाशिक व पी. एम.सी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, अहिल्यानगर यांना मिळाले. एकल नृत्यात सर्वोत्कृष्ट सायली सुदाम तेलंगे, लातूर उत्कृष्ट भूमी भूषण मोरे, ठाणे उत्तम प्रेरणा प्रविण कांबळे, सातारा प्रशंसनिय जिविका येडे, नागपूर व हर्ष पंकज शिवगण, रत्नागिरी यांना मिळाले.
एकल गायनात सर्वोत्कृष्ट प्रथमेश दांडेकर, बृहन्मुंबई उत्कृष्ट विराज अतुल लोंढे, नाशिक उत्तम पार्थ आसाराम पवार, बीड प्रशंसनिय आराध्या भुषण खैरनार, जळगाव व कुशल कमलाकर म्हेत्रे, पुणे हे विजेते ठरले. एकल वाद्यात सर्वोत्कृष्ट मल्हार जगदीश पाटील, कल्याण उत्कृष्ट श्रीहरी विजय केते, सातारा उत्तम यग्नेश अशोक बाबर, ठाणे प्रशंसनिय कार्तिक शिवाजी सांगळे, परभणी व रुद्र गजेंद्र राजापुरे, लातूर यांनी पारितोषिक पटकावले. या बालकलाकारांचा पारितोषिक स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
















