परभणी: परभणीतील तरूणाईला व्यसनाच्या विळख्यात जखडणा-या एमडी पावडरचा सुळसुळाट थांबण्याचे नाव घेत नाही. वस्त्यांवस्त्यांमध्ये सहज उपलब्ध होणारी एमडी पावडर आता परभणीतील सामाजिक आरोग्याला लागलेला कर्करोग ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या नाकावर टिच्चून एमडीची तस्करी आणि विक्री खुलेआम सुरुच आहे. पोलिस काही आरोपींना पकडतात, गुन्हे दाखल करतात, मोठमोठ्या कारवायांची प्रसिध्दीही होते; मात्र एमडीची तस्करी रोखण्यात ही यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
मानवत पोलीस ठाणे क्षेत्रात क्राइम ब्रांच ने धाडसी कारवाई करत तब्बल १४ लाख ६४ हजार ४०० रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त केला आहे. मानवत-पाथरी रस्त्यावर दि. २७ जुलै रोजी एन.एम. ६१ वर रत्नापूर शिवारात मारोती मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी अलीम शेख खाजा (वय ३२) याच्या जवळील ५२ ग्रॅम ३८ एमजी वजनाचा १० लाख ४७ हजार ६०० रुपयांचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. दुसरा आरोपी शाहरुख फिरोजखान पठाण (वय २९) याच्या ताब्यातील २० ग्रॅम ८४ वजनाचा ४ लाख १६ हजार ८०० रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत स्कूटी (क्रमांक एमएच १२ एमइ ९३७०) व एमडी अंमली पदार्थ असा एकूण १४ लाख ६४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रांच प्रमुख गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. दर्शन शिंदे, सपोनि. खिल्लारे, बिकड, सपोउपनि. सोनटक्के, सावंत, अनिस कौसडीकर, सय्यद उमर, फयाज सय्यद, मुंढे, समीर, बावरी व टीमने केली आहे. या प्रकरणी मानवतचे पोलिस हवालदार सय्यद उमर यांच्या फिर्यादीवरून २ आरोपींविरूध्द मानवत पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.नि. खिल्लारे करत आहेत.
परभणीच्या युवा पिढीला नशा आणि गुन्हेगारीच्या गर्तेत लोटणा-या अंमली पदार्थ माफीयांची गय केली जाणार नाही. १४ लाखांची एमडी पावडर जप्त करून आम्ही केवळ सुरुवात केली आहे. परभणी पूर्णपणे नशामुक्त करेपर्यंत आणि या साखळीतील मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळेपर्यंत ही मोहिम थांबणार नाही, असे क्राइम ब्रांच प्रमुख गजेंद्र सरोदे यांनी सांगितले आहे
















