पुणे : लोहगाव विमानतळावर विमान प्रवाशांना पुरविण्यात येणा-या सोयी-सुविधांच्या सर्वेक्षणात पुणे विमानतळ पास झाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांतील विमानतळावरील सुविधेबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण व ‘एसीआय-एएसक्यू’ (एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी) यांनी अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळाचा दर्जा सुधारला असून, ७४ स्थानांवरुन ६७ व्या स्थानी झेप घेतली आहे. पुणे विमानतळावर नव्या टर्मिनल सुरू झाल्यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. शिवाय प्रवासी सुविधांच्या बाबतीतला दर्जाही सुधारला आहे. देशांतील व्यस्त विमानतळामध्ये पुणे विमानतळाचा समावेश आहे. दुसरीकडे प्रवाशांना सेवा देण्यामध्ये पुणे विमानतळावर सुधारणा होत आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे.