धनकवडी : प्रतिनिधी
धनकवडी बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी पुन्हा एकदा टोळी संघर्षाचा रक्तरंजित अध्याय समोर आला. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के (रा. आंबेगाव पठार) याच्यावर गोळ्या झाडून त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खून टोळी युद्धातील ‘रिप्लाय अटॅक’ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अक्षय म्हस्के याच्यावर प्रथम दोन-तीन गोळ्या झाडण्यात आल्या. तो जखमी होऊन खाली पडताच हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अक्षयचा भाऊ आकाश म्हस्के हा सध्या वनराज आंदेकर खून प्रकरणात तुरुंगात आहे. विशेष म्हणजे, वनराज आंदेकर यांचाही याच पद्धतीने गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर आंदेकर टोळीनेही संबंधित आरोपीच्या भावांवर अशाच स्वरूपाचे हल्ले केल्याची चर्चा आहे.
या ताज्या हत्येमुळे पुण्यातील टोळी संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचे स्पष्ट होत असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील वाढत्या टोळीवादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
















