मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या राज्यातील लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत येणा-या लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या संवर्गासाठी आयोगातर्फे घेतली जाणारी टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्णपणे रद्द करण्यात आली. आयोगाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक बुधवारी (२० मे २०२६) प्रसिद्ध केले. या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार असून अंतिम निकालही कमी वेळेत जाहीर होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५ व्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. हा नवा बदल बैठकीच्या दिनांकापासून म्हणजेच २४ एप्रिल २०२६ पासूनच तात्काळ अंमलात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असूनही आयोगाकडून पुन्हा स्वतंत्रपणे टंकलेखन चाचणी घेतली जात होती. म्हणजेच उमेदवारांची एक प्रकारे दोनदा परीक्षा होत होती. या दुहेरी प्रक्रियेमुळे अंतिम निकाल लागण्यास मोठा विलंब होत होता. हीच बाब लक्षात घेऊन आयोगाने कौशल्य चाचणी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
आता नव्या बदलानुसार सर्वप्रथम एक पूर्वपरीक्षा घेतली जाईल, त्यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर अंतिम निकाल दिला जाईल. त्यात मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे शिफारस करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे उमेदवारांकडे परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीच शासनाचे अधिकृत टंकलेखन प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक व तांत्रिक पात्रता उमेदवाराने विहित मुदतीत पूर्ण केलेल्या असणे आवश्यक राहणार आहे.
आता या नवीन बदलामुळे परीक्षा लवकर पूर्ण होण्यास मदत होणार असून, मुख्य परीक्षेनंतर थेट पात्र उमेदवारांची शिफारस यादी शासनाकडे पाठवली जाणार आहे. त्यामुळे विलंब कमी होणार आहे. आयोगाच्या या विद्यार्थीभिमुख निर्णयाचे स्पर्धा परीक्षा विश्वातून जोरदार स्वागत होत असून, यामुळे उमेदवारांचा ताण कमी होणार आहे.
प्रमाणपत्रांची पडताळणी आता शासन स्तरावर
नव्या नियमानुसार आता केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाईल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी थेट शासनाकडे पाठवली जाईल. त्यानंतर संबंधित उमेदवारांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची मूळ खातरजमा आणि पडताळणी शासन स्तरावर केली जाणार आहे.
निकाल वेळेत लागणार
या निर्णयासंबंधी माहिती देताना आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी जे उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीचे प्रमाणपत्र धारण करतात, असे उमेदवारच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा देण्याकरिता पात्र ठरत असल्याने त्यांच्या मुख्य परीक्षेनंतर पुन्हा टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेचा विलंब टळण्यास मदत होणार आहे, असे सांगितले.
















