धाराशिव : प्रतिनिधी
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतक-यांच्या बांधावर दाखल झाले आहेत. शिंदे हे सध्या धाराशिव जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देत लोकोपयोगी कीट दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. या मदतीसाठी खास १२ साहित्यांचे कीट तयार करण्यात आले आहे. हे कीट घेऊन १८ टेम्पो धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत. या मदतीच्या कीटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या या कीटमध्ये साधारण १२ दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. ही सर्व सामग्री पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी यासाठी देण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या कीटमध्ये काय काय?
५ किलो पीठ, पोहे, मूगडाळ, शेंगदाणे, २ ब्लँकेट, साखर, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद, तेल, मीठ
हा किती निर्लज्जपणा : संजय राऊत
मदतीच्या कीटवर स्वत:चा फोटो लावल्याने त्यांच्यावर टीकाही होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच यावरून टीका केली आहे. आता आपला सही, शिक्का, चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याचे काम सुरू आहे. हा किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि तुम्ही भगव्या पिशव्या त्यावर तुमचे फोटो, पक्षाचे चिन्ह हे प्रचार करण्याचे कोणते तंत्र या लोकांनी अवलंबले आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

