लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात आज पर्यंत ७४ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आजूनही पावसाअभावी २६ टक्के क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. शासनाने सोयाबीन, मुग, उडीद, तूर, ज्वारी बाजरी पिकांचा विमा उतरवण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख असेल असे जाहिर केले. पिक विमा भरण्यासाठी केवळ चार दिवसाचा कालावधी रहिला आहे. ज्या शेतक-यांनी पेरणी उरकल्या, अशा २ लाख ९९० शेतक-यांनी पिकांचा विमा भरला आहे. पण ज्या शेतक-यांनी अद्याप पेरणीच केली नाही. त्या शेतक-यांनी पिक विमा भरायचा कसा, असा प्रश्न शेतक-यांच्या समोर उभा राहिला आहे.
खरीप हंगामातील पिकांचा कालावधी मुख्यता तीन ते साडेतीन महिण्याचा आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीवर एल निनोचा प्रभाव दिसून येत आहे. खरीपाच्या पेरण्या सुरू होऊन दोन महिण्याचा कालावधी होत आला आहे. जुलै अखेर पर्यंत खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी पोषक वातावरण असते. त्यानंतर पुढे पेरण्या झाल्यास त्याचा रब्बीच्या पेरणीवर परीणाम होऊन उत्पादनातही फारसी वाढ होत नाही. पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना ई-पिक पाहणी करण, फार्मर आयडी उपलब्ध करून देणे अनिवार्य केले आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतक-यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत होत आहे.
अहमदपूर तालुक्यातील सर्वाधिक शेतक-यांनी भरला पीक विमा
पिक विमा भरण्यासाठी चार दिवसाचा कालावधी उरला आहे. आज पर्यंत जिल्हयात २ लाख ९९० शेतक-यांनी पिक विमा भरला आहे. यात सर्वाधिक अहमदपूर तालुक्यात ३२ हजार ६५९ शेतक-यांनी पिक विमा उरवला आहे. तसेच औसा तालुक्यात ३२ हजार ५६८, चाकूर तालुक्यात १६ हजार ६३०, देवणी तालुक्यात ९ हजार ४४३, जळकोट तालुक्यात १७ हजार ४५२, लातूर तालुक्यात १५ हजार ४७५, निलंगा तालुक्यात ३० हजार २५६, रेणापूर तालुक्यात १५ हजार ५३१, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४ हजार १३८, तर उदगीर तालुक्यातील २६ हजार ८३८ शेतक-यांनी पिक विमा भरला आहे.
शेतक-यांना पीक विमा भरण्याचे आवाहन
खरीप हंगामातील पेरणीवर पावसाचा परीणाम झाला आहे. जुलै अखेर पर्यंत पावसाचा चांगला जोर राहिल्यास १०० टक्के पेरण्या पूर्ण होतील. सोयाबनी पेरण्यावर शेतक-यांचा सर्वाधिक भर असून जुलै अखेर पर्यंत पेरणी करता येईल. शेतक-यांना पिक कापणी प्रयोगाच्या नुसारच विमा मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांनी पेरण्या उरकल्या आहेत. त्यांनी पिक विमा भरून पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.
















