लातूर : प्रतिनिधी
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे आणि मुख्य प्रवाहाबाहेर असलेल्या ५९ जातींना आरक्षणाचा न्याय मिळावा, या मागण्यांसाठी अनुसूचित जाती (एससी) उपवर्गीकरण समर्थन समिती लातूर जिल्ह्याच्या वतीने दि. २७ जुलै रोजी दुपारी १२.१५ वाजता लातूर शहरात महामोर्चा काढण्यात आला. समाजाच्या भावना आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येत्या १ ऑगस्ट रोजी आरक्षणाचे उपवर्गीकरण जाहीर करावे अन्यथा येत्या काळात राज्यातील मातंग समाज एकत्र येऊन निवडणुकीत मतांच्या माध्यमातून उत्तर देईल, असा इशारा मातंग समाजाच्या वतीने महामोर्चातून देण्यात आला.
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी काढण्यात येणा-या महामोर्चाची जय्यत तयारी अनुसूचित जाती (एससी) उपवर्गीकरण समर्थन समिती लातूरच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून सुरु होती. त्यामुळे सोमवारी अगदी सकाळपासूनच मातंग समाजबांधव लातूर शहरातील गंजगोलाई परिसरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात जमत होते. चारचाकी वाहनांनी संपूर्ण जिल्ह्यातून मातंग समाजबांधव महामोर्चासाठी आले होते. दुपारी १२ वाजेपर्यंत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात हजारो मातंग समाजबांधव एकत्र आले आणि महामोर्चाला सुरुवात झाली.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन महामोर्चा निघाला. हजारो मातंग समाजबांधवांच्या सहभागाने हा महामोर्चा गंजगोलाई, मेनरोडा, महात्मा गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे हा महामोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोहोंचल्यानंतर तेथे महामोर्चाचा समारोप झाला. समारोपाच्या सभेत अनेक मान्यरांनी आपले मनोगत व्यक्त केले. लातूर शहरातून निघालेला हजारोंचा महामोर्चा आणि अनुसूचित जातीतील असंख्य जाती अजूनही मागास आहेत, त्यांचा विकास झाला नाही व त्या अजूनही प्रवाहात आलेल्या नाहीत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे ही काळाची गरज असून ही गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे अन्यथा सर्व समाज रस्त्यावर उतरेल, असादेखील इशारा मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला.
महिलांचा लक्षवेधी सहभाग
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती (एससी) उपवर्गीकरण समर्थन समिती लातूरच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चात महिलांचा लक्षवेधी सहभाग होता. संपूर्ण जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात महिला या महामोर्चात सहभागी झाल्या होत्या.
युवकांचा जोश आणि जयघोष
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरातून महामोर्चा निघाला. महामोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झाला. सुमारे ५ ते ६ किलो मीटरचा हा महामोर्चा. या महामोर्चात सहभागी युवकांचा जोश आणि जयघोष शेवटपर्यंत कायम होता. अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण झालेच पाहिजे, ही मुख्य घोषणा युवक करीत होते.
















