उदगीर : प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उदगीर नगरपरिषदेमार्फत बनशेळकी तलाव परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्षा स्वाती हुडे व मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम उत्साहात पार पडली.
शहराला दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. कालांतराने केंद्राच्या परिसरात वाढलेले गवत, झुडपे, तसेच फ्लॉक्युलेटर (जलशुद्धी प्रक्रिया केंद्र) मध्ये साचलेला गाळ आणि भिंतींवर जमा झालेले शेवाळ यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होती. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेने नियोजनबद्ध विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील वाढलेले गवत व झुडपे काढण्यात आली. वीज पुरवठ्यासाठी असलेल्या डीपी परिसरातील धोकादायक वाढलेली झाडे छाटण्यात आली. तसेच फ्लॉक्युलेटरमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढून टाकण्यात आला आणि भिंतींवर साचलेले शेवाळ साफ करण्यात आले. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिक स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी मुख्याधिकारी दिपक मोरे, गटनेते अनिल मुदाळे, मनोज पुदाले, सय्यद ताहेर, स्वच्छता सभापती राजकुमार हुडगे, पाणीपुरवठा सभापती सय्यद रेश्मा खतिजा इमरोज, महिला बालकल्याण सभापती सय्यद खुर्शीदबी हनिफसाब, नगरसेवक सचिन हुडे, विजय निटूरे, अमर सूर्यवंशी, धिरज कसबे, चाऊस उमर यांच्यासह नरसिंग शिंदे, विरकुमार अंबरखाने बांधकाम अभियंता गुरुप्रसाद लोणारे, अनिल कुरे, एनयुएलएमचे शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट, विशाल गुडसुरकर, प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता सिद्दीकी मिसबाह, व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ज्ञ शिवशंकर मटके, शहर समन्वयक प्रफुल आदावळे आदी उपस्थित होते.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील कटके यांच्यासह कर्मचारी सय्यद नासेर, शकील व इतर कर्मचारी, अग्निशमन प्र.विभाग प्रमुख संजय क्षीरसागर विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या स्वच्छता निरीक्षक सरूबाई चव्हाण, प्रभारी स्वच्छता निरीक्षक सिकंदर शेख, विनोद रंगवाळ, उमाकांत गंडारे तसेच स्वच्छता विभागातील सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
















