32.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeपरभणीबालविवाह रोखणे पालक, नागरीकांची जबाबदारी : आ.डॉ. राहुल पाटील

बालविवाह रोखणे पालक, नागरीकांची जबाबदारी : आ.डॉ. राहुल पाटील

परभणी : परभणी जिल्ह्यात ४८ टक्के बालविवाह होत असून मुलामुलींची मानसिक तयारी नसताना बालविवाह करणे हे एक प्रकारचे पाप आहे. असे बालविवाह रोखण्याची खरी जबाबदारी पालकांची आणि नागरिकांची आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले.

परभणी तालुक्यातील पिंगळी येथे रेडिओ परभणी एफ एम., युनिसेफ, स्मार्ट आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून आमदार डॉ. पाटील बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, माविमचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे, नाथ शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अंबादासराव गरुड, स्मार्टच्या कार्यक्रम व्यवस्थापक महेक रस्तोगी, कार्यक्रम सहयोगी सलोनी सिंग, पिंगळीचे सरपंच अंगदराव गरुड, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साक्षी अंबुरे, गोकुळनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीताताई गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.डॉ . पाटील म्हणाले की, बालविवाहला मुलामुलींनीच आपल्या आई-वडिलांकडे विरोध केला पाहिजे. मला शिकू द्या, नोकरी करू द्या, आर्थिक समृद्ध होऊ द्या त्याशिवाय मी लग्न करणार नाही असे धाडसाने सांगितले पाहिजे. मुलींचा विवाह २० वर्षा नंतरच करावा, असे आवाहन आ. डॉ. पाटील यांनी यावेळी केले.

महिला व बाल विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव म्हणाले की, जिल्ह्यात प्रशासनाने गेल्या दोन वर्षात ३०पेक्षा जास्त बालविवाह थांबवले आहेत. हे सगळं समाजाच्या मार्फत शक्य झाले आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. कुठे बालविवाह झाल्यास नवरदेव, मुलाच्या आईवडिलांवर, व-हाडी, बँड अशा सगळ्यांवरच गुन्हा दाखल होऊ शकतो. कुठे बालविवाह होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ वर कॉल करून माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत रेडिओ परभणी एफएमच्या वतीने करण्यात आले. प्रास्ताविक केंद्र प्रमुख संजय पाटोळे यांनी केले. आभार आणि सूत्रसंचालन विद्या मालेवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता बालविवाह प्रतिबंध सामूहिक शपथ घेऊन झाली. यशस्वीतेसाठी आकाश सोळंके, जी. ए. खंदारे, संदीप आस्वार, ऋतुजा चांदणे, माविम सहयोगिनी निर्मला ढवळे, कदम आणि गोकुळनाथ महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR