Homeमुख्य बातम्याबिहारमध्ये भाजप मित्र पक्षांवर डोळा; आमदार फुटीची चर्चा

बिहारमध्ये भाजप मित्र पक्षांवर डोळा; आमदार फुटीची चर्चा

पाटणा : वृत्तसंस्था
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. याठिकाणी राष्ट्रीय लोक मोर्चाचे ३ आमदार माधव आनंद, रामेश्वर महतो आणि आलोक सिंह यांनी पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्या निवासस्थानी झालेल्या लिट्टी चोखाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली आहे. या तिन्ही आमदारांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आरएलएमचे तिन्ही आमदार पाटण्यात होते परंतु त्यांनी उपेंद्र कुशवाह यांच्या घरी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. या तिन्ही आमदारांनी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली होती त्यामुळे या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची भेट आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निमंत्रणाला डावलणे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. हे आमदार नाराज असून ते सामूहिकपणे एखादा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत असे बोलले जाते.

रामेश्वर महतो यांना उपेंद्र कुशवाहा मंत्रीपदासाठी बढती देतील अशी अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी कुशवाहा यांचा मुलगा दीपक प्रकाश यांना मंत्री करण्यात आले. तेव्हापासून रामेश्वर महतो अस्वस्थ आणि संतप्त असल्याचे बोलले जाते. खरे तर उपेंद्र कुशवाहा यांनी त्यांच्या पत्नीला आमदारकीचे तिकीट देऊन त्यांना आमदार केले होते तर त्यांच्या मुलालाही सरकारमध्ये मंत्री बनवले होते. यामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये असंतोषाची ठिणगी पेटली आहे. आता तीन आरएलएम आमदारांनी लिट्टी-चोखा मेजवानीला उपस्थित न राहून अप्रत्यक्षपणे ही नाराजी दाखवून दिल्याचे बोलले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR