पहिल्याच संयुक्त सभेत राज ठाकरे यांचा जोरदार घणाघात
मुंबई : प्रतिनिधी
वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात. विजयाचे तंत्र माहीत असते, तेव्हा सत्तेचा माज येतो. भाजपचे सध्या तसेच सुरू आहे. यांनी मुंबई, महाराष्ट्र, देश विकायला काढला. हे मनाला वाटेल ते करायला लागले आहेत. आली कुठून हिंमत, कुणाला विचारायचे नाही, जनता नाही, काय नाही. आम्हाला वाटले म्हणून केले. हे कोण आहेत लोक, असा सवाल उपस्थित करीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही भाजपवर हल्लाबोल केला.
मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुंबईकरांना आज ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात पार पडली. सभास्थळी एलईडी स्क्रीन्सही आधीच लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे अपक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी आपल्या लाव रे तो व्हीडिओ शैलीत सत्ताधा-यांचा समाचार घेतला. एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, तुळजापूरमध्ये ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचे तिकीट, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला स्वीकृत नगरसेवकपद, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला.
यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य करीत भाजपने उद्योगपती गौतम अदानींना मोठ्या प्रमाणात उद्योग दिले, असा आरोप केला. राज ठाकरेंनी २०१४ साली अदानींचे साम्राज्य किती होते आणि २०२५ पर्यंत त्यात किती वाढ झाली, यासंबंधीचा लेखाजोखा मांडत भाजपला घेरले.
आम्ही एकत्र येण्याचे कारण म्हणजे मुंबईवर आलेले संकट. अनेक वर्षे मी यावर बोलत आलो, कशा प्रकारचा डाव रचला जातो, राज्य सरकारने मध्यंतरी हिंदी सक्तीचा प्रस्ताव आणला. मी कडाडलो आणि उद्धव ठाकरेही कडाडले. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तो हिंदी सक्तीचा विषय तुम्हाला चाचपडून पाहण्याचा होता. तुम्ही जागे आहात का, मराठी माणूस जिवंत आहे का, फक्त चाचपडणे होते तुम्हाला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या सरकारला काय फेफरे आले माहीत नाही. मनाला वाटेल ते करायला लागले. आली कुठून हिंमत, कुणाला विचारायचे नाही, जनता नाही, काय नाही. आम्हाला वाटले म्हणून केले. हे कोण आहेत लोक, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
बोगस व्होटर आणि ईव्हीएम मशीनच्या लढाया सुरू आहेत. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये काँग्रेसबरोबर भाजपने युती केली. ६६ जण बिनविरोध निवडून आले, त्यांना मतदानच करू दिले नाही. आज ६६ आहेत, उद्या आकडे वाढत जाणार. त्यांना कळले, लोकांना कसेही विकत घेऊ शकतो. विकले जातात याचे वाईट वाटते, असेही राज ठाकरे म्हणाले. काही जण तिकीट वाटपात नाराज झाले, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील… आताच आहे ते जातील. गेलेले तर परत येतीलच, असे म्हणत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावरून दिलगिरी व्यक्त केली.
पैसे फेकले की विकत
घेऊ, भाजपचा माज
पैसे फेकले की विकत घेऊ, आला कुठून एवढा आत्मविश्वास, काँग्रेस सत्तेवर होती, अनेक लोक सत्तेत होती. पण ते लोकांना घाबरून असायचे. जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणे बिबरणे काहीच नाही. गृहित धरून टाकले तुम्हाला. कुठून येतात मते यांच्याकडे, कशी येतात? हे सर्व ठिकाणी सुरूच आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
शेवटची निवडणूक
आता त्वेषाने लढा
आपल्याला मुंबई वाचवायची आहे, ही शेवटची लढाई आहे. त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल, अशा शब्दात राज ठाकरेंनी मराठी माणसाला विनंती केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
१० वर्षांत अदानींचे साम्राज्य देशभरात
२०१४ मोदी पंतप्रधान झाले. पण मला २०२४ च्या नंतर समजायला लागले. विधानसभा निवडणुकीनंतर रिसर्च टीममुळे काही गोष्टी समोर आल्या, त्याने धक्का बसला, असे सांगत त्यांनी एक व्हीडीओ दाखविला. त्यात २०१४ मध्ये अदानींचे साम्राज्य मर्यादित होते. मात्र, २०२५ पर्यंत अदानींचे साम्राज्य संपूर्ण देशात पसरले. या १० वर्षांत शेकडो प्रकल्प अदानींना मिळाले. मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अदानी कुठे होते, आता त्यांच्या प्रकल्पांनी देश व्यापला. जगात असा एकही माणूस नसेल जो १० वर्षांत इतका श्रीमंत झाला. या देशात बरेच उद्योगपती असताना एकाच माणसाला सर्व गोष्टी दिल्या. सिमेंट, वीज दिली. सिमेंट उद्योगात अदानी कधी नव्हताच. आज देशातील दोन नंबरचा उद्योगपती आहे. सर्व पोर्ट अदानीला, सर्व विमानतळे अदानीला. उद्या वीज बंद केली तर आपण काही बोलू शकणार नाही, अशा शब्दांत अदानींच्या साम्राज्याची पोल राज ठाकरे यांनी खोलली.
मुंबईचा बॉम्बे करण्याचा डाव
देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आव्हान देतो की, मोदींपासून ते तुमचे आणि तुमच्या चेल्या-चंपाट्यांचे अगदी वर्गातल्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू-मुस्लिम न करता केलेले भाषण दाखवा, आम्ही सर्व मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो, अशी बोचारी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अहो, मेवाभाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवता, हे सगळे अडानीकरण चालले आहे. आमच्या मुंबादेवीवरून मुंबईचे नाव ठेवले. आता या मुंबईचे नाव बॉम्बे करण्याचा डाव चालला आहे, अशा शब्दांत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी ठाकरेंचे अस्तित्व संपविणारे नेतृत्व अजून जन्माला आले नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी टीका केली.
मुंबईचा महापौर आता
ठाकरे बंधू ठरवतील
साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे. कालपरवा अण्णामलाई आले. मुंबई महाराष्ट्राची नाही ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुंबईला तोडण्याचा उद्योग सुरू झाला. राज आणि उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्या जीवावर ही निवडणूक लढवत आहात. तुम्हाला आमची साथ आहे. तुम्हाला मराठी माणूस यश देईल, मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, हा विश्वास व्यक्त करतो असे म्हणत शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ठाकरे बंधूंचे कौतुक केले.

