Homeमुख्य बातम्याभूकंपाचा पॅटर्न बदलणार, गंगेची पाणी पातळी वाढणार!

भूकंपाचा पॅटर्न बदलणार, गंगेची पाणी पातळी वाढणार!

प्लेटचा खेळ । इंडियन टेक्टानिकल प्लेटचे डेलामिनेशन सुरू; हिलियम-३ गॅस बाहेर पडत असल्याने प्लेटमध्ये भेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संपूर्ण भारत ज्या भारतीय टेक्टॉनिकल प्लेटवर आहे. ती प्लेट दोन भागात विभागत आहे. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, इंडियन टेक्टॉनिकल प्लेटचा खालचा भाग वेगळा होऊन तो पृथ्वीच्या आतील भागात (मेंटल) खचत चालला आहे. या प्रक्रियेला भौगोलिक भाषेत ‘डेलामिनेशन’ म्हणतात. ही नवीन माहिती समोर आल्यानंतर आता हिमालयाच्या भागातील भूकंपाचा पॅटर्न बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंडियन टेक्टॉनिकल प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यात घर्षण आणि टक्कर ही जवळपास ६ कोटी वर्षापासून सुरू आहे. या घर्षणामुळेच हिमालय रेंज तयार झाली आहे. यापूर्वी वैज्ञानकांची धारणा होती की भारतीय प्लेट ही पूर्णपणे युरेशियन प्लेटच्या खालच्या भागात सरकत आहे. मात्र आता नव्या अभ्यासानुसार इंडियन टेक्टॉनिकल प्लेटचा भाग पूर्णपणे एकसमान नाही. तिबेटच्या खालचा भाग जास्त दाट आणि जड आहे. तो भाग वरच्या भागापासून वेगळा होत आहे. तो भाग मेंटलमध्ये बुडत आहे. वरचा हलका भाग हा पुढे सरकत आहे.
वैज्ञानिकांनी या नव्या संशोधनाची माहिती भूकंपीय तरंगांचे विश्लेषण केल्यानंतर समोर आली आहे. त्याचबरोबर संशोधकांनी तिबेटमधील गरम पाण्याच्या स्त्रोतांमधील हिलियम आयसोटोपची देखील तपासणी केली होती. हिलियम-३ गॅस हा मेंटलमधून म्हणजे पृथ्वीच्या आतील भागातून येतो. हा गॅस वर येत असेल तर प्लेटमध्ये भेग पडत आहे असा निष्कर्ष निघतो. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील भू वैज्ञानिक सायमन क्लेम्परर आणि त्यांच्या टीमने हा अभ्यास केला आहे.
हिमालयाच्या उंचीत वाढ
टेक्टॉनिकल प्लेट्स या पृथ्वीच्या बा  भागात असलेले क्रस्टचे (पदर) तुकडे आहेत. हे भूभागाचे तुकडे मॅग्मावर तरंगत असतात. इंडियन टेक्टॉनिकल प्लेट ही प्रत्येक वर्षी उत्तर दिशेला ५ सेंटिमिटरने सरकते. मात्र आता ही तुटत आहे. वैज्ञानिकांनी जीपीएस डेटा, भूकंप लहरी आणि सॅटेलाईट इमेजच्या आधारे तिबेट उंच होत आहे असा निष्कर्ष काढला आहे. प्लेटचा दबाव जास्त झाल्यामुळे वरचा भूभाग हा हिमालयाला उंच करत आहे. प्रत्येक वर्षी ५ सेंटीमीटरने हिमालयाची उंची वाढत आहे.
हवामान बदलास गती मिळणार
हिमालयन क्षेत्रात १० कोटी पेक्षा जास्त लोक राहतात. दिल्ली एनसीआरपर्यंत या भूकंपाचे धक्के बसतात. जर याची तीव्रता वाढली तर जवळपास १ लाख कोटी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हिमालयातील जैव विधितता देखील धोक्यात येऊ शकते. हवामान बदल अजून वेगवान होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR